कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील दुर्दैवी घटना
फैजपूर- यावल-फैजपूर रस्त्यावर भरधाव ट्रकने पाच वर्षीय बालिकेला चिरडल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली. या घटनेनंतर मोठ्या संख्येने जमाव जमला होता. या प्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली असून अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.
कुरकुरे घेण्यासाठी जाणार्या बालिकेला चिरडले
सावद्याकडून न्हावीकडे खत देण्यासाठी जाणारा ट्रक (एम.पी.09 एच.एफ 1733) ने विशाखा दीपक चव्हाण (वय 5) या बालिकेला चिरडले. मयत विशाखा चव्हाण व तिची बहीण करुणा चव्हाण हे दोघे आजीसोबत खाजगी हॉस्पिटलमध्ये शेजारी राहणार्या व्यक्तीला पाहण्यासाठी आले होते. विशाखाने आजी कल्पना भालेराव यांच्याकडे कुरकुरे घेण्यासाठी पाच रुपये मागितले होते तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या टपरीवरून कुरकुरे घेऊन येत असतांना ट्रकने धडक दिली. विशाखाच्या अंगावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालक प्रभू कालूसिंग जामोद (28, रा.लखनकोट, ता.मानवद मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध कल्पना प्रदीप भालेराव (40, रा.पाच बंगला, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक जिजाबराव पाटील, आधार निकुंभे, हेमंत सांगळे, मालवीय, पाचपोळ आदींनी धाव घेत मृतदेह यावल येथे शवविच्छेदनासाठी हलवला.