फैजपूर- शहरातील भुसावळ रस्त्यावरील जुन्या बहिणाबाई शाळेजवळ विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने बैलगाड्यावर असलेल्या तीन ते चार मजुरांचे प्राण वाचले. फैजपूर शहरात दुपारी हलक्या स्वरूपात पाऊस पडल्याने शेतात काम करणारे मजूर घराकडे निघाले होते तर जयंत दिनकर कोल्हे यांच्या मालकीची बैलगाडी शेतातून परत असतांना जुन्या बहिणाबाई शाळेजवळील एका विजेच्या खांबात विद्युत प्रवाह उतरलेला असतांना त्याच खांबाला बैलजोडीतील एका बैलाचा स्पर्श झाल्याने बैल जागीच ठार झाला. ही घटना घडताच बैल गाड्यावर असलेल्या महिला मजुरासह चौघांनी बैल गाडीवरून पटापट उड्या घेतल्याने जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच विद्युत मंडळाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन विद्युत प्रवाह बंद केला. या घटनेत सुमारे 60 हजारांच्या जवळपास नुकसान झाले आहे.
ऐन पेरणीच्या तोंडावर कोल्हे कुटुंबांवर संकट
आधीच यावल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला असल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे. त्यातच आता ऐन पेरणीचे दिवस असल्याने शेतकर्यांचा मित्र असलेल्या बैलाचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या कुटुंबावर संकट कोसळले आहे. जयंत कोल्हे यांना वीज वितरण कंपनीने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.