फैजपूर उपविभागीय कार्यालयात शैक्षणिक दाखल्यांसाठी विद्यार्थांची गर्दी

0

नऊ हजार शैक्षणिक दाखल्यांचे या शैक्षणिक वर्षात वाटप

फैजपूर- दरवर्षी विद्यार्थ्यांना लागणार्‍या शैक्षणिक दाखल्यांचे प्रमाण वाढत आहे. दहावी व बारावीचा निकाल लागला की विद्यार्थ्यांना शैक्षणिक जातीचे दाखले काढावे लागतात. यावल रावेर तालुक्याच्या मध्यभागी फैजपूर येथे उपविभागीय कार्यालय आहे. त्यामुळे दोघा तालुक्यातील नागरीक व विद्यार्थी हे फैजपूर येथे दाखले काढण्यासाठी येत असतात. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी जातीचे दाखले अनिवार्य असल्याने फैजपूर उपविभागीय कार्यलयात विद्यार्थी व पालकांची रोज गर्दी दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष हे परीक्षेचा निकाल लागल्या नंतर सुरू होते. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी व शैक्षणिक वर्षातील लागलेली फि ची रक्कम स्कॉलरशीप परत मिळावी यासाठी जातीचे दाखले अतिशय महत्वाचे असतात या यासाठी पालकांना पाल्यांच्या भविष्यासाठी पालक आपली कामे सोडून विद्यार्थ्यांसोबत जातीच्या दाखले मिळवण्यासाठी धावपळ दिसून येत आहे.

जातीच्या प्रकरणावर ताबडतोब होते स्वाक्षरी
फैजपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत शासनाच्या सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी जातीचे दाखले मिळवण्यासाठी आपली प्रकरण त्या ठिकाणी जमा करतात तेथून ते प्रकरण पूर्ण तपासून फैजपूर उपविभागीय कार्यलयात प्रांतधिकारी यांच्या स्वाक्षरी साठी याठिकाणी येते. येथे प्रकरण आल्यानंतर लागलीच प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना जातीचा दाखले लगेच मिळत असल्याने विद्यार्थी व पालक यांची जास्त फिराफिर होत नसल्याने विद्यार्थी समाधानी आहेत. यासाठी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी कामकाज पाहत आहेत.

यावल तालुक्यात दाखले वाटप
यावल व रावेर तालुक्यातील शैक्षणिक वर्षापासून मिळालेले दाखके यात नॉन क्रीमिलेअर एक एप्रिल 2018 पासून तर सेंटर कॉस्ट एक जानेवारी पासून नॉन क्रिमिलेअर एक हजार 200, सेंटर कॉस्ट 140, अनुसूचित जमाती 459, विशेष मागासवर्गीय 250, अनुसूचित जाती 463, इतर मागासवर्गीय 1164, भटक्या जमाती 156 एकूण तीन हजार 832 जातीच्या दाखल्यांचे आज पर्यंत वाटप झाले.

रावेर तालुक्यात दाखले वाटप
नॉन क्रीमिलीयर 1434, इतर मागासवर्गीय 1616 अनु. जाती 570, सेंटर कॉस्ट 187, भटक्या जमाती 255, विशेष मागासवर्गीय 181 एकूण 4243 दाखल्यांचे 25 जूनपर्यंत वाटप झाले.

पडताळणी करून प्रकरण सादर करावीत -प्रांताधिकारी
माझ्याकडे जातीच्या दाखल्यांचे प्रकरण आले ते मी पूर्ण तपासून त्यावर लागलीच एका तासात स्वाक्षरी करतो. जातीच्या दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये हाच आपला हेतू आहे. विद्यार्थी व पालकांनी कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करूनच सेतू केंद्रात प्रकरण दाखल करावे जेणेकरून आपले प्रकरण लवकर मार्गी लागेल. शालेय शैक्षणिक कामासाठी हे दाखले अतिशय महत्वाचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे दाखले बाकी असेल त्यांनी तत्काळ ते काढावेत, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे.