फैजपूर नगरपालिकेच्या सभेत 44 विषयांना मंजुरी

0

फैजपूर- फैजपूर पालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी पालिका सभागृहात सकाळी 11 वाजता नगराध्यक्षा महानंदा होले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत 44 विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात तडवी वाडा मल्टिपर्पज हॉल व कब्रस्तान कंपाऊंड व मिल्लतनगर भागातील इब्राहीम मशीद परीसरामधील रस्ता खडीकरण व डांबरीकरण या कामांसह पालिका कार्यालय उपयोगी निविदांवर चर्चा झाली तर शहरातील खिरोदा रोडवरील महानुभाव पंथाच्या स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल, आठवडे बाजारातील राममंदिर परीसर, दक्षिण बाहेरपेठ भागातील मरीमाता मंदिर ते मस्कामाता मंदिर परीसरपर्यंत पेव्हर्स ब्लॉक बसविणे, शहरातील विविध भागांत सात रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे व नऊ गटारींच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
फैजपूर शहरातील बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गावरील खिरोदा रोडवरील लक्ष्मी जीन ते फिल्टर प्लांट या भागाचे जिल्हा परीषदेकडून नगरपरीषदेकडे रस्ता हस्तांतरण करण्याच्या मागणीच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष कलीम खाँ मण्यार, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सभेला माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक हेमराज चौधरी, भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. विषय पत्रिकेचे वाचन दिलीप वाघमारे यांनी केले तर सभेचे कामकाज सभा लिपीक सुधीर चौधरी, संतोष वाणी, पाणीपुरवठा व आरोग्य विभाग अभियंता साळुंखे व आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे यांनी पाहिले.

मक्तेदाराच्या नुकसान भरपाई दाव्यावर चर्चा
विषय पत्रिकेवर विषय क्रमांक दोन हा फैजपूर पालिकेच्या आरक्षण क्रमांक 45 सि.स.न.ं 3804 / 11 या जागेवर पालिकेचे संकुल बांधकाम करण्याकामी भुसावळ येथील मक्तेदार एम.बी.अंगळी यांनी मक्ता घेतला होता. या मक्तेदाराने पालिकेविरुध्द नुकसान भरपाई दावा न्यायालयात दाखल केला आहे. हा विषय सभेसमोर घेण्यात आला होता. यावर न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील निर्णयानुसार कार्यवाही होणे उचित होईल व सदर आदेशाचे पालन करणे बंधनकारक मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले.