विविध मागण्यांबाबत प्रशासनाला साकडे : सकारात्मक दखल घेण्याची ग्वाही
फैजपूर- दिव्यांग सेनेतर्फे दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी फैजपूर पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुभाष चौक येथून छत्रीचौकमार्गे फैजपूर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. पालिकेवर हा मोर्चा धडकल्यानंतर फैजपूर नगरपालिका हद्दीतील राहत असलेल्या मूकबधीर, कर्णबधीर, अंध, अस्थिव्यंगांना फैजपूर नगरपालिका अंतर्गत असलेल्या सुविधा देण्याची मागणी करण्यात आली.
अशा आहेत मोर्चेकर्यांच्या मागण्या
पालिकेच्या स्व-उत्पन्नातून पाच टक्के निधीचा वापर करण्यात यावा, फैजपूर पालिका व्यापारी संकुलामध्ये दिव्यांगांना प्रत्येकी गाळा देण्यात यावा, घरपट्टी व नळपट्टीत 50 टक्के सूट देण्यात यावी यासह 15 विविध मागण्यांचे निवेदन नगराध्यक्षा महानंदा होले व उपनगराध्यक्ष कलिम मण्यार यांना देण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, गटनेता मिलिंद वाघूळदे, गटनेता शेख कुर्बान, नगरसेवक अमोल निंबाळे, चंद्रशेखर चौधरी आदी उपस्थित होते.
यांचा मोर्चात सहभाग
या मोर्चात भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, उपाध्यक्ष भरत जाधव, जळगाव शहराध्यक्ष शकिल सर, फैजपूर शहराध्यक्ष नितीन महाजन, उपाध्यक्ष नाना मोची, ललित वाघुळदे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हे, मुन्ना चौधरी, विनोद बिर्हाडे, जितेंद्र मेढे, रीयाज मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अन्वर खाटीक, गोकुळ कापडे, दिव्यांग सेनेचे बिजलाल पाटील, भगवान कोळी, प्रदीप परदेशी, महेश महाजन, पवन शिरनामे, संजय रमेश चौधरी, नीलेश पाटील, अशोक भालेराव, मुख्याध्यापक गणेश गुरव, प्रवीण सपकाळे सर यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी शासन नियमाप्रमाणे शहरातील दिव्यांग बांधवांना सवलतींचा लाभ देण्यात येईल, असे नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष कलीम खां मण्यार व उपस्थित नगरसेवकांनी आश्वासन दिले.