फैजपूर- म्युनिसीपल हायस्कूलच्या मागील पटांगणावर घाणीचे साम्राज्य पसरल्यानंतर मंगळवारी पालिकेकडून संपूर्ण हायस्कूलच्या पटांगण जेसीबी लावून स्वच्छ करण्यात आले. सोमवार, 1 जुलै रोजी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज तसेच शालेय शिक्षण सभापती शेख कुर्बान, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, मुख्याध्यापक आर.एल.आगळे यांनी हायस्कूलच्या मागील बाजूच्या मैदानाची पाहणी केली. पाहणीदरम्यान घाणीचे साम्राज्य असल्याचे वास्तव निर्दशनात आले होते. या मैदानावर काही नागरीकांनी घरातील सांडपाण्याचे पाईप मैदानात सोडलेले होते तसेच पूर्ण परीसर हा अस्वच्छतेने कळस गाठला होता. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. या संदर्भात मंगळवारच्या अंकात ‘दैनिक जनशक्ती’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना स्वच्छतेबाबत मागणी केल्यानंतर मंगळवारी सकाळपासून पालिका सफाई कामगार यांनी जेसीबीच्या सहाय्याने पूर्ण परीसर स्वच्छ केला.
जिल्हा परीषदेला दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश
म्युनीसीपल हायस्कूलला लागून असलेल्या जिल्हा परीषद मराठी मुलांची शाळा नंबर एक असून या शाळेच्या खोल्यांना गळती लागली असल्याने तारपत्री लावून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. याबाबत सविस्तर माहिती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना फोनवरून जिल्हा परीषद शाळेची वस्तुस्थिती सांगितली. सोमवारी संध्याकाळी यावल गटशिक्षणाधिकारी शेख यांनी लागलीच जिल्हा परीषद शाळेला भेट देऊन संबंधित मुख्याध्यापक यांना वर्गखोल्या दुरुस्तीचे तत्काळ प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.
परीसर स्वच्छ ठेवण्याची जवाबदारी आपली
म्युनीसीपल हास्कूलच्या पाठीमागील मैदानात खूप कचरा जमा झाला होता. आज पालिकेकडून संपूर्ण मैदान स्वच्छ करण्यात आले आहे. नागरीकांना शाळेच्या मैदानावर कुठल्याही प्रकारची कचरा टाकू नये तसेच आपलेच पाल्य या शाळेत शिक्षण घेत असून त्यांचे आरोग्य खराब होणार नाही याची काळजी नागरीकांनी घेतली पाहिजे. पालिका स्वच्छतेबाबत पूर्ण प्रयत्नशील आहे मात्र आपला परीसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची असल्याचे नगराध्यक्षा महानंदा टेकाम होले म्हणाल्या.
अतिक्रमण करणार्यांना नोटीसा -मुख्याधिकारी
शाळेच्या मैदानाची मंगळवारी पालिकेकडून स्वच्छता करण्यात आली. तेथील रहिवाशांना पालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या. यानंतर त्या मैदानावर कोणी अस्वच्छता केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. संपूर्ण शहर स्वच्छ राहिले पाहिजे यासाठी पालिका कटिबद्ध आहे तसेच नागरीकांनी सुद्धा पालिकेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. शाळेच्या मैदानावर ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना 1965 च्या 52,53 नुसार नोटिसा देण्यात येणार आहे व पुढील कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी किशोर चव्हाण
म्हणो.
स्वच्छता झाल्याने वृक्षारोपण करणार -महामंडलेश्वर
शाळेच्या मागील बाजूस काल आम्ही पाहणी केली असता पूर्ण अस्वच्छता दिसून आली. आज पुन्हा या ठिकाणी आलो असतो तोच परीसर संपूर्ण स्वच्छ झालेला दिसला त्यामुळे पालिका प्रशासन, पत्रकार व सफाई कर्मचारी यांना खूप धन्यवाद देतो. अशीच स्वच्छता कायम राहावी यासाठी रहिवाशांनी काळजी घेतली पाहिजे. या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन महाराज म्हणाले.