फैजपूर- फैजपूर पालिकेच्या गुरूवारी झालेल्या विशेष सभेत विषयपत्रिकेवरील सर्वच 21 विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विशेष सभेचे आयोजन प्रभारी नगराध्यक्ष कलीम खा मण्यार यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात करण्यात आले. या सभेसमोर असलेल्या विषयपत्रिकेवर 21 विषय चर्चेसाठी होते त्यात प्रामुख्याने पाणीपुरवठा विषयी असलेल्या कामांना व पाणीपुरवठाविषयी करण्यात येणार्या कामांच्या निविदा उघडण्यात आल्या. विशेष म्हणजे 13 व्या वित्त आयोग अंतर्गत तहानगरातील पाण्याच्या टाकीचे उर्वरीत काम पालिका फंडातून करणे, इस्लामपूरा भागात ठिकठिकाणी नवीन आरसीसी गटारी बांधणे, तहानगर भागात हमीद मिस्तरी यांच्या घरापासून व खळवाडी भागातील उर्दू शाळेपासून नवीन गटार बांधणे यासह मिल्लत नगरातील गट नं.560 मधील जीम परीसरात पीसीसी करून पेव्हर्स ब्लॉक बसविणे, जीमसाठी ओपन व इनडोअर साहित्य खरेदी करणे तसेच मिल्लत नगरातील ओपनस्पेस गट नं.566 ला आरसीसी कंपाऊंड करणे व बगीचा विकसीत करणे, मिल्लतनगरातील गट नं.1236 ला आरसीसी कंपाउंड व बालवाडी केंद्र उभारणे तसेच आमदार हरीभाऊ जावळे यांच्या विकास निधी अंतर्गत फैजपूर शिवारातील खंडोबावाडी मागील जुना खंडोबा ते यावल रोडपर्यंत रस्ता डब्ल्यूबीएम करण्याबाबत नाहरकत देणे, दिव्यांगांना व्यवसाय करण्याकामी लागणारा नाहरकत फी मध्ये सवलत देणे अशा 21 विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
यांची विशेष सभेला उपस्थिती
यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक हेमराज चौधरी, भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, गटनेता शेख कुर्बान, बांधकाम समिती सभापती रशीद तडवी, आरोग्य समिती सभापती अमोल निंबाळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. सभेचे कामकाज पाणीपुरवठा व आरोग्य विभाग अभियंता विपुल साळुंखे, सभा लिपिक सुधीर चौधरी, लेखापाल संजय बाणाईते, बांधकाम विभाग वरीष्ठ लिपिक दिलीप वाघमारे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख नंदकिशोर कापडे, स्वच्छता समन्वयक विक्की बागुल यांनी पाहिले.