प्रस्ताव मंजुरीनंतर वाढीव वस्तीतील नागरीकांना मिळणार सोयी-सुविधा
फैजपूर- फैजपूर शहराचा वाढता विस्तार पाहता पालिकेने हद्दवाढीचा निर्णय घेत नगरपालिका क्षेत्राचा सुधारीत हद्दवाढीच्या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या विशेष सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. या सभेत विविध शहर विकासासाठीच्या 16 विषयांना सभेने मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा महानंदा होले. गेल्या अनेक वर्षापासून हद्दवाढीचा प्रस्ताव प्रलंबित आहे मात्र काही त्रृटींमुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळत नव्हती मात्र सोमवारी झालेल्या विशेष सभेत सुधारीत हद्दवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
तर पालिकेच्या उत्पन्नात होणार वाढ
शहराची हद्दवाढ झाल्यास पालिका हद्दबाहेरील ज्या रहिवाशांना पालिका सेवा पुरवीत आहे त्यापासून पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकार्यांकडे दाखल करून त्यांच्या मार्फत मंजुरीसाठी नगर विकास खात्याकडे पाठविला जाणारा आहे. या सभेत वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत शहरातील दोन्ही स्मशानभूमीचे ओटे वाढवून विस्तारीकरण करणे तसेच बंद पडलेल्या हायमास्टच्या ठिकाणी एलईडी लाईट बसविणे, उंच पोलवर लाईट बसविण्यासाठी लोडर व्हॅन खरेदी करणे यासह विविध विभागातील खरेदींसाठी व आठवडे बाजार दैनंदिन भुईभाडे, वसुली मक्ता व अन्य वार्षिक करारांच्या विषयांना या सभेत मंजुरी देण्यात आली. सभेला उपनगराध्यक्ष कलीम मणियार, भाजप गटनेते मिलिंद वाघुळदे, ज्येष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी, शालेय शिक्षण सभापती वत्सला कुंभार, सभापती नयना चंद्रशेखर चौधरी, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती साहिमाबी मलक आबीद, महिला व बालकल्याण समिती सभापती फातेमा बानो रईस मोमीन, नियोजन व विकास समिती सभापती अमोल किशोर निंबाळे यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. यशस्वीतेसाठी दिलीप वाघमारे, सुधीर चौधरी, रवींद्र ठाणगे, शिव नेहते, हेमराज बढे, रवींद्र मेढे, हमीद तडवी यांनी परीश्रम घेतले.