फैजपूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात
पाचशे रुपयांची लाच भोवली : जळगाव एसीबीच्या कारवाईने पोलीस दलात खळबळ
भुसावळ : तक्रारदाराच्या किरकोळ दारू व्यवसायावर कारवाई न करण्यासाठी दरमहा पाचशे रुपयांची लाच मागणार्या फैजपूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अनिल भगवान महाजन (40, रा.भोकरीकर गल्ली, रावेर) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने फैजपूर पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारताना अटक केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस ठाण्यातच स्वीकारली लाच
यावल तालुक्यातील पिंपरूड येथील 20 वर्षीय तक्रारदार यांचा किरकोळ दारू विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दरमहा पाचशे रुपये हप्त्याची मागणी करीत पहिला हप्ता म्हणून पाचशे रुपयांची लाच नाईक अनिल महाजन यांनी 3 सप्टेंबर रोजी तक्रादाराकडे मागितली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी दुपारी दोन वाजता पोलीस ठाण्यातच आरोपी महाजन यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे सो, पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे (रीडर), पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (रीडर) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीखक संजोग बच्छाव, पोलीस अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ आदींनी हा सापळा यशस्वी केला.