रावेर (शालिक महाजन) : कोरोनासारखा जीवघेणा वायरस फैजपूर प्रांतात न येण्यासाठी तसेच जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले सकाळी आठ वाजल्यापासून आपल्या सहकार्यांना सोबत घेत गावो-गावी फिरून लोकांना घरात राहण्याचा सल्ला देत आहेत. काही ठिकाणी स्वतः प्रांतच हातात माईक घेऊन जनतेत कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसून येत आहेत. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या पत्नी डॉक्टर असून त्यादेखील कोरोनाच्या संकटकाळात रुग्णसेवेची खिंड लढवत आहेत तर त्यांचे कर्तव्यदक्ष पती जनसेवा व कोरोना विरुध्द लढण्यासाठी दररोज यावल-रावेर भागात शंभर किलोमीटर फिरल्याशिवाय जनतेला सुरक्षित घरात बघितल्याशिवाय फैजपूरात परतत नाहीत.
थोरबोले दाम्पत्याची अशीही समाजसेवा
कोरोनाचे संकट दिवसें-दिवस वाढत असून हे येणारे परकीय संकट परतून लावण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकार्यांनी कंबर कसली आहे. कोणी मुलांना सोडून सेवा देताय तर कोणी दुसर्यांच्या मुलांसाठी, वृध्द आई- वडिलांसाठी सेवा देत आहेत. अशीच सेवा देणारे फैजपूर विभागाचे प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले सध्या त्यांच्या कामांमुळे चांगलेच चर्चेत आहे.
डॉ.सुप्रिया थोरबोले यांचे कर्तव्यदक्ष पती तथा प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले दोघे ही डॉक्टर असल्याने त्यांना कोरोनाचे संकट चांगलेच ठाऊक आहे. म्हणून डॉ.सुप्रिया थोरबोले या प्राथमिक आरोग्य केंद्र, पाडळसे (ता.यावल) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्ण सेवा देऊन कोरोना विरुध्द खिंड लढवत आहेत तर प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले रावेर-यावल येथील नागरीकांच्या सुरक्षेच्या मोहिमेवर निघतात. यामध्ये नागरीकांच्या आरोग्याची सुरक्षितता व त्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अन्न-धान्य पुरवण्याची व्यवस्था करणे, एनजीओमार्फत किराण्याचे किट तयार करून त्याचे वाटप, रावेर, सावदा, फैजपूर ,यावल येथे कोरोना संदर्भात खबरदारी म्हणून अनेक शाळा,हॉस्पीटल,अधिग्रहीत करून येणार्या पेशंटवर उपचाराची व्यवस्था ही सर्व कामे त्यांच्या आदेशावरुन केली जात आहे. आज दिवसभर सुध्दा त्यांनी रावेर तहसीलला बैठक, शहरातील विविध ठिकाणी भेटी, वाघोड आरोग्य केंद्राची पाहणी, वाघोड जि.प.शाळेतील विलगीकरण केंद्राची पाहणी, चोरवड आतंरराज्य सिमेची दिवसभर पाहणी करून मग सायंकाळीच प्रांतधिकारी फैजपूरात आपल्या मुख्यालयी परत येतात.
एकही रुग्ण न आढळल्याचे समाधान
डॉ.अजित थोरबोले म्हणाले की, कोरोना आल्यापासुन व लॉकडाउन झाल्यापासून आधी धान्य वाटप, नंतर कोरोना संदर्भात सुरक्षितता,
मग विलगीकरण कक्ष आणि आता पुढचा धोका लक्षात घेता मध्य प्रदेश- महाराष्ट्र सीमेची सुरक्षा महत्वाचे आहे. नागरीकांना मास्क वापरण्यासह जनतेला घरातच राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांची कोरोना विरुध्द लढण्याची जिद्द , धैर्य बघता आतापर्यंत फैजपूर प्रांत विभागात एकही कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळलेला नाही, याचे मोठे समाधान प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना आहे.