फैजपूर प्रांत कार्यालयात 100 दाखल्यांचे प्रांतांच्या डिजिटल स्वाक्षरीने वाटप

0

काही तासातच मिळाले दाखले ; दलालांची चलती बंद : कमी वेळात, कमी पैशात व कमी श्रमात मिळताय दाखले

फैजपूर (निलेश पाटील)- फैजपूर उपविभागीय कार्यालयातून देण्यात येत असलेले शैक्षणिक व जातीचे दाखले डिजिटल स्वरुपात वाटप करण्यात येत आहे. प्रांतधिकारी यांची डिजिीटल स्वाक्षरी मिळणार्‍या दाखल्यावर असणार आहे. फैजपूर प्रांत कार्यालयात ऑनलाईन सुविधा 12 ऑक्टोबर2018 पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत प्रांत कार्यालयातून डिजिटल स्वाक्षरीचे 110 दाखल्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दैनिक जनशक्तीला दिली. पूर्वी नागरीकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यासाठी पालकांना दलालांमार्फत नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला, डोमेसाईल व इतर दाखले जास्तीचे पैसे देवून मिळत होते. दाखले घेण्यासाठी शासकीय फीच्या व्यतिरिक्त दलालांकडून जादा पैसे मोजावे लागत होते पण या ऑनलाईन डिजिटलमुळे 55 ते 75 रुपयात आता दाखले मिळणार आहे. यात पूर्वी पंधरा दिवसात दाखले मिळत होते आता तेच दाखले काही तासातच नागरीकांना उपलब्ध होत आहे.

आतापर्यंत 110 दाखल्यांचे वाटप
आतापर्यंत फैजपूर प्रांत कार्यालयातून 110 दाखल्याचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे नागरीकांचा वेळ, पैसा आणि दलालांपासून सुटका मिळाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. ऑनलाईन डिजिटल दाखले करण्यासाठी फैजपूर उपविभागाचे प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी सप्टेंबर महिण्यात यावल रावेर तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र प्रमुखांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. त्यात डॉ.थोरबोले यांनी ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरी संदर्भात सविस्तर माहिती दिली होती त्याची अंमलबजावणी 12 ऑक्टोबरपासून करण्यात आली.

डिजिटल ऑनलाईनमुळे दलालांना बसली चपराक
विद्यार्थ्यांना लागणारे महत्त्वाचे कागदपत्र म्हणून नॉन क्रिमिलर, जातीचा दाखला, डोमेसाईल व इतर शैक्षणिक दाखले आहेत हे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालक यांनी धावपळ करावी लागत होती. हे दाखले काढण्यासाठी दलालांची मदत घेवून दाखले काढले जात होते यात पालकांना जास्तीचा मोबदला दलालांना द्यावा लागत होता. पण या ऑनलाईन डिजिटलमुळे दलालांना चांगलीच चपराक बसली आहे. नागरीकांची आर्थिक पिळवणूक, वारंवार माराव्या लागणार्‍या चकरा यांना आळा बसला आहे.

मूळ कागद पत्रानेच निघणार दाखले
जातीच्या दाखल्यासाठी पूर्वी झेरॉक्स कागदपत्रे जोडल्या नंतर जातीचे दाखले मिळत होते. पण आता ऑनलाईन डिजिटल झाल्यामुळे मूळ कागदपत्र (ओरीजनल) जोडावी लागणार आहे. दाखल्यांचे प्रकरण दाखल केल्यानंतर संबधित व्यक्तींना त्यांचे मूळ कागदपत्र परत मिळणार आहे त्यामुळे झेरॉक्स प्रत आता जोडता येणार नाही.

दोन तासातच मिळणार दाखले
दाखल्यासाठी पूर्वी लागणारा वेळ बघता डिजिटल स्वाक्षरीमुळे दोन तासातच दाखले हातात मिळणार आहे. यासाठी मूळ कागदपत्र पूर्ण तयार करून सेतू सुविधा केंद्रात जावून ते दाखल करून घ्यायचे आहे. सेतू सुविधातून ऑनलाईन सबमिट झाल्यानंतर प्रांतधिकारी ते बघून लागलीच त्या प्रकरणावर डिजिटल स्वाक्षरी क्लिक करून दाखले देणार आहेत.

पैसे मागणार्‍यांची तक्रार माझ्याकडे करा -प्रांतधिकारी डॉ.थोरबोले
नागरीकांना अव्वाच्या सव्वा पैसे घेवून त्यांची पिळवणूक करून त्या संबधितांना दाखले दलाल देत होते. ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीमुळे नागरीकांना सोयीचे झाले आहे. अवघ्या 55 ते 75 रुपयात दाखले मिळणार आहे जर कोणी या व्यतिरीक्त पैसे जास्त मागितले तर माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी सांगितले आहे. नागरीकांनी दाखल्यांचे प्रकरण दाखल केल्यानंतर आपले प्रकरण कुठल्या प्रक्रियेत (प्रोसेस) मध्ये आहे हे आपल्या मोबाईल वर बघू शकणार आहे. डिजिटल स्वाक्षरी हे एका क्लिक वर 500 दाखल्यावर होवू शकेल, अशी सुविधा आहे. त्यामुळे कोणीही प्रांत कार्यालयात दाखल्यासाठी येवू नये.