फैजपूर मधुकर सहकारी कारखान्याची 44 वी वार्षिक सभा ठरली वादळी

0

सभासदांनी सत्ताधारी संचालकांना धरले धारेवर : आजी-माजी आमदारांनी केले शांततेचे आवाहन

फैजपूर- फैजपूर मधुकर सहकारी कारखान्याच्या 44 व्या वार्षिक सभेत सत्ताधारी संचालकांना सभासदांसह माजी संचालकांनी चांगलेच धारेवर धरल्याने रविवारी सकाळी 11 वाजता मैदानावर झालेली सभा चांगलीच गाजली. मसाका संचालकांनी 26 रुपये किलोची साखर 19 रुपये दराने विक्री केल्याने कारखान्याला 13 कोटींचा तोटा अल्ला या माजी संचालक नितीन राणे यांच्या वक्तव्याने आणखीनच गोंधळात भर पडली तर चेअरमन शरद महाजन यांनी या प्रश्‍नाला उत्तर देणे टाळल्यानंतर विरावलीच्या राकेश फेगडे विरावली यांनी सत्तेतील संचालकांनी अहवालात संपूर्ण आकड्यांची तफावत दिसून येत ऊस उत्पादक सभासदांना अजूनपर्यंत उसाला जास्त भाव देण्यात आला नाही तसेच युनियनचे माजी अध्यक्ष ए.जी.महाजन यांनी तर सत्ताधारी संचालकांना चांगलेच चिमटे घेतल्याने गोंधळातच सभा पार पडली.

कमी दरात साखर विक्रीने तोटा -माजी संचालक नितीन राणे
गेल्या तीन वर्षांपासून सभासदांना साखर मिळत नाही तसेच संचालकांच्या शून्य नियोजनामुळे कारखान्याची वाईट परिस्थिती या संचालकांनी आणली तसेच हे संचालक निवडून आल्यानंतर 26 रुपये किलोची साखर 19 किलोने विक्री केल्याने त्यावेळेस 11 रुपये फरकाप्रमाणे जवळपास 13 कोटींचा तोटा मसाकाला आला असल्याचे माजी संचालक नितीन राणे यांनी म्हणताच खळबळ उडाली तर चेअरमन शरद महाजन प्रश्‍नाला उत्तर देऊ न शकल्याने गोंधळ अधिकच वाढला.

कारखाना हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन -आमदार जावळे
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अखंडपणे गेल्या 43 वर्षांपासून असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना असून तो यापुढेही असाच सुरू राहिला पाहिजे म्हणून सर्वांनी राजकीय जोडे बाहेर काढून कारखान्याच्या हितासाठी एकत्र यावे, असे आवाहन आमदार हरीभाऊ जावळे व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन, प्रमुख पाहुणे माजी खासदार उल्हास पाटील, आमदार हरीभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार रमेश चौधरी होते. सभेत आजी-माजी आमदारांनी कारखान्याच्या हितासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले असले तरी उपस्थित सभासदांनी संचालकांच्या शून्य नियोजन कारभारावर आक्षेप घेत आरोपांच्या फैरी झाडल्या. यात मसाकाची वार्षिक सभा चांगलीच वादळी ठरली. जास्त ऊस देणार्‍या उत्पादक सभासदांचा सत्कार करण्यात आला.

साखरेला अल्प दरामुळे तोटा -शरद महाजन
प्रास्ताविकात चेअरमन शरद महाजन यांनी कारखान्याची परीस्थिती कथन केली यावर्षी साखरेला दर कमी असल्याने 62 कोटींचा तोटा या वर्षी आला आहे तसेच पाण्याअभावी गेल्या हंगामात ऊस पीक उत्तम दर्जाचे घेता आले नाही यामुळे संचित तोटा वाढतांना दिसत आहे तसेच शेतकर्‍यांनी इतर कारखान्याला ऊस न देता मसाकाला ऊस पुरवठा देण्याचे आवाहन केले. पूर्व हंगामी कर्ज जिल्हा बँक कडून तांत्रिक अडणाचीमुळे मिळत नाही या साठी प्रयत्न सुरू असल्याचे शरद महाजन यांनी प्रास्ताविकात सांगितले.

राज्यातील 97 कारखान्यांची बिकट स्थिती
आमदार हरीभाऊ जावळे यांनी सभेला संबोधित करतांना सांगितले की, स्व.दादासाहेब जे.टी.महाजन व स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचे कारखाना उभारणीत मोठे योगदान आहे. राज्यातील 97 कारखान्यांची परीस्थिती अतिशय बिकट आहे, अशी परिस्थिती आपल्या मसाकावर येऊ नये यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे असल्याचे आमदार हरीभाऊ जावळे यांनी सांगितले. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आमदार जावळे यांच्या कारखाना हितासाठी सर्वांनी एकत्र यावे या आवाहनाला आपला पूर्ण पाठींबा असल्याचे सांगितले. मधुकर कारखाना हा या भागाचा मानबिंदू असून तो जगणे महत्वाचे असल्याचे माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले. विषय विवेचन पत्रकाचे वाचन प्रा.कार्यकारी संचालक तेजेंद्र तळले यांनी केले.

सत्ताधारी संचालक सभासद आणि विरोधी सभासद यांच्या शाब्दिक चकमक
मधुकर सहकारी साखर कारखण्याची सभा सुरू झाल्यानंतर चेअरमन शरद महाजन यांनी अहवालातील विषय वाचन झाल्यानंतर राकेश फेगडे व नितीन राणे यांनी संचालकांना कारखान्याच्या कारभाराविषयी प्रश्न विचारतांना सत्ताधारी संचालकांचे सभासद यांनी जोरदार विरोध करत दोघा सभासदांकडून शाब्दिक चकमक 30 मिनिटे सुरू राहिले. या सर्वांना शांत करण्यासाठी संचालक मंडळाचा कस लागत होता तरी गोंधळ कमी झाला नाही शेवटी आमदार हरीभाऊ जावळे यांना व्यासपीठावरून खाली उतरून सभासदांना शांत राहण्याचे आवाहन केले. सर्व गोंधळ उपस्थित सभासद बघत होते. या गोंधळातही सभा तीन तास सुरू होती. सूत्रसंचलन किरण चौधरी यांनी तर आभार व्हा.चेअरमन भागवत पाटील यांनी मानले.

यांची होती सभेला उपस्थिती
जेडीसी बँकेचे संचालक गणेश नेहते, जिल्हा परीषद सदस्य प्रभाकर सोनवणे, जिल्हा बँकेचे माजी व्हा.चेअरमन आर.जी.पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी, माजी व्हा.चेअरमन राजीव पाटील, यावल उपनगराध्यक्ष मुकेश येवले, केतन किरंगे, हिरालाल चौधरी, हर्षल पाटील, विलास चौधरी यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.