फैजपुर। बकरी ईदनिमित्त फैजपूर येथे बकरी बाजारात जवळपास 50 लाखांची उलाढाल बोकड खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येथील बाजारात बोकडांची आवक होती मात्र बाहेरील व्यापार्यांअभावी खरेदीसाठी मंदी होती. राज्यभरात शेळी, मेंढी विक्रीसाठी फैजपूर येथे दर बुधवारी भरणारा बकरी बाजार प्रसिद्ध आहे. याठिकाणी नियमितप्रमाणे जिल्ह्यातील व्यापारी मोठ्या संख्येने शेळी, मेंढी खरेदी करण्यासाठी दर बुधवारी येतात. मात्र, वर्षातून बकरी ईदनिमित्त याठिकाणी बोकडांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.
दोन हजारांवर विक्रेत्यांची हजेरी
बकरी ईदनिमित्त याठिकाणी बोकडांचे चार बाजार भरतात व संपूर्ण महाराष्ट्रामधून कोकण, विदर्भ, पुणे, मुंबई, मध्यप्रदेश आदी ठिकाणावरुन व्यापारीवर्ग, ग्राहक मोठ्या संख्येने येतात. तर या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर यावल, रावेर, चोपडा यासह सातपुडा पर्वतातील तसेच मध्येप्रदेशातील दोन हजारापेक्षा जास्त विक्रेत्यांनी बोकड विक्रीसाठी आज बुधवारी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फैजपूर उपबाजार समितीमधे हजेरी लावली होती.
दोन हजार बोकड विक्रीसाठी
बकरी ईदनिमित्त येथील बाजारात यावल-रावेर, चोपडा तालुक्यांसह सातपुडा पर्वत व मध्यप्रदेशातून 2 हजार बोकड विक्रीसाठी आले होते. खरेदीसाठी जळगांव जिल्ह्यातील व्यापारी वर्ग वगळता महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, पुणे, मुंबई, मध्यप्रदेश या ठिकाणावरून व्यावसायिक खरेदीसाठी न आल्याने अनेक विक्रेत्यांना बोकड परत न्यावे लागले.
बाजार समितीला उत्पन्न
ईदनिमित्त बोकड विक्रिच्या दुसरा बाजार असल्याने याठिकाणी बोकड विक्रीसाठी 2 हजारांपेक्षा जास्त बोकड विक्रीसाठी बाजारात होते. त्यात जास्तीत-जास्त मोठा एक नग बोकडची किंमत 20 ते 25 हजारापर्यंत किमतीचे होते. हा बाजार कृषी उत्पन्न उपबाजार परिसरासह बाजार समिती ते संपूर्ण यावल रोडवरील राजबागपर्यंत मोठ्या प्रमाणात भरला होता. सायंकाळपर्यंत हा बाजार भरल्याने वाहतूक मार्ग बदलविण्यात आला होता. 2 सप्टेंबर रोजी बकरी ईदनिमित्त या बाजारात बुधवारच्या बोकड विक्रिमधून 40 हजाराचे जवळपास बाजार समितीला उत्पन्न मिळाल्याचा अंदाज आहे.