फैजपूर शहरातील सर्वच एटीएमची सुरक्षा ‘रामभरोसे’

सीसीटीव्ही लावण्याबाबत उदासीनता : गॅस कटरच्या वापरादरम्यान मशीनला आग

फैजपूर (निलेश पाटील) : फैजपूर शहरातील एसबीआयच्या एटीएममधील 45 लाखांची रोकड लांबवण्याचा प्रयत्न फसल्याचा प्रकार शनिवारी उघड झाल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकारानंतर शहरातील पाचही बँक एटीएमचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा अधोरेखीत झाला आहे. एकही एटीएमवर सुरक्षा रक्षक नसल्याची बाब चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडू पाहत आहे. गतवर्षीच जे.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील युनियन बँकेचे एटीएम फोडण्यात आले मात्र या घटनेतील चोरट्यांना अटक करण्यात अद्यापपर्यंत यंत्रणेला यश आलेले नाही.

सुदैवाने बचावली रोकड
शहरातील यावल रस्त्यावर दुध शीतकरण केंद्राजवळ भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन लावण्यात आले आहे. या एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री गॅस कटरच्या सहाय्याने मशीन तोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात सुदैवाने चोरट्यांना यश आले नाही. शनिवारी मध्यरात्री 3.30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे दूध शीतकरण केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. या प्रकारात चोरटे संख्येने नेमके किती होते, त्यांचे वर्णन काय याची माहिती एटीएम मशीन उघडल्यानंतर त्यातील मशीनमधील डीव्हीआरमधून मिळणार होती मात्र माहितगार चोरट्यांनी एटीएम मशीनच्या कॅमेर्‍यांवरच स्प्रे मारल्याने आता ही आशादेखील धूसर झाली आहे.

दोन दिवसांपूर्वीच भरली होती रोकड
शनिवार व रविवार लागून सुट्या असल्याने शुक्रवारीच स्टेट बँकेच्या एटीएममध्ये सुमारे 40 लाखांचा भरणा केल्याचे समजते तर यापूर्वीच एटीएममध्ये सुमारे पाच लाखांची रोकड असल्याचे समजते. एटीएममध्ये रोकडचा भरणा झाल्याची शिवाय सुरक्षा रक्षक नसल्याची माहिती चोरट्यांना असल्यानेच त्यांनी कट रचून एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रकारात मशीनला आग लागल्याने चोरट्यांना रीकाम्या हाती परतावे लागले. पहाटेच्या सुमारास एटीएमम मशीनमधून धूर निघाल्याचे दिसताच नागरीकांनी पोलिसांना तसेच बँक प्रशासनाला माहिती कळवली.

लॉक उघडल्यानंतर येणार अंदाज
चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केल्याने एटीएम मशीनचे मोठे नुकसान झाले आहे तर एटीएम संबंधित अधिकारी नाशिक येथे गेले असून ते शनिवारी रात्री उशिरा वा रविवारी आल्यानंतर एटीएम मशीनचे डिजिटल लॉक उघडले जाणार आहे. लॉक उघडल्यानंतरच एटीएम मशीनमधील रोकडचा तपशील बाहेर येणार असून या प्रकारात नोटा जळाल्या वा नाही तसेच डीव्हीआरमधून नेमके काय फुटेज प्राप्त होते? हेदेखील कळू शकणार आहे. दरम्यान, एटीएम फोडण्याच्या प्रकारामुळे मात्र शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील अनेक भागात सीसीटीव्ही लावण्यात आले नसल्याने व्यापार्‍यांनी सीसीटीव्ही लावावेत, असे आवाहन सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी केले आहे.