पांढर्या रंगाच्या ओमनितून पळविले ; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
फैजपूर (प्रतिनिधी)- फैजपूर शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या जगनाडे नगर जवळून बकर्या चारणार्या एका पंधरा वर्षीय तरुणाला दोन अज्ञातांनी चारचाकी वाहनातून पळवून नेल्याची घटना रविवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून अपहरणकर्त्या मुलाचे नाव अक्षय समाधान कोळी असे आहे. या घटनेप्रकरणी दोन अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील दक्षिण बाहेर पेठ मध्ये राहणारा अक्षय कोळी व त्याचा मित्र सोनी भिल जगनाडे नगर मधील वीट भट्ट्या जवळ बकर्या चारीत होते. यावेळी एक पांढर्या रंगाचे चार चाकी वाहन त्यांच्या जवळ आले व त्यातील दोन अनोळखी इसमांनी अक्षय यास बोलावून गाडीत जबरदस्ती बसवून पळवून नेले. याबाबतची माहिती त्याच्या सोबत असलेल्या सोनू भिल याने अक्षय घरी सांगितली. ही घटना वार्यासारखी शहरात पसरल्याने अनेकांनी जगनाडे नगराकडे धाव घेतली. पोलिसांनाही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस, अक्षयचे नातेवाईक व नागरिकांनी परीसर पिंजून काढला मात्र अक्षय कुठेही मिळून आला नाही या घटनेप्रकरणी अक्षयचे वडील समाधान कोळी यांनी फैजपूर पोलिसात तक्रार दाखल केली.यामूळे दोन अज्ञातांना विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणार
भुसावळ रस्त्यावरील जगनाडे नगर पासून तर पिंपरुड फाट्या पर्यंत असलेल्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. त्याचा फायदा तपासासाठी होतो का? याचीही खात्री करण्यासाठी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही तपासले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पालकांमध्ये भितीचे वातावरण
रविवारी 10 सकाळी वाजता एका पंधरा वर्षीय तरुणाचे अपहरण झाल्याची बातमी गावातील सर्व व्हाट्सऍप गृप वर वार्यासारखी पसरल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अक्षयचे कोणी अपहरण केले?अक्षयला कशासाठी पळवून नेले यासह अनेक शंका निर्माण होत आहे. यासाठी पोलिसांना अक्षयचा कसून शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास एपीआय दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामलाल साठे करीत आहे.