अन्न-औषध प्रशासनाचे दुर्लक्ष : तरुण पिढी होतेय व्यसनाधीन
फैजपूर- राज्य शासनाने गुटखा बंदीचा निर्णय घेतला असला तरी फैजपूर शहरात मात्र खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. कारवाईची जवाबदारी असलेली अन्न-औषध प्रशासन विभागाच्या यंत्रणेचे मात्र या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा उघड आरोप होत आहे.
फैजपूर ठरतेय गुटखा विक्रीचे केंद्र
शहरात गेल्या दोन वर्षांपासून गुटका विक्री अल्प प्रमाणात सुरू होती परंतु शहरात या गुटखा विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने आता खुलेआमपणे गुटखा विक्री सुरू आहे. शहरात शाळा, महाविद्यालय आहे या ठिकाणी रावेर, सावदा, चिनावल, यावल, चोपडा यासह फैजपूर शहराला लागून असलेली सर्व लहान गावे आहेत. फैजपूरात सर्वच महाविद्यालय असल्याने शहराची विद्याचे माहेर घर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मात्र या शहराची ओळख आता गुटखा व्यापाराचे केंद्र म्हणून होवू पाहत आहे.
विक्रेते पोहोचवताय खेडोपाडी गुटखा
गुटखा विक्री हि शहरातील सर्वच लहान मोठी दुकानात सहच उपलब्ध होत आहे. याचे कारण म्हणजे शहरातच या गुटखा विक्रीचा मोठा व्यापारी असल्याने लहान किरकोळ व्यावसायिकांना बाहेर गुटका घ्यायला जावे लागत नाही. अर्थात शाळा महाविद्यालय परीसरात सुद्धा गुटखा विक्री सुरू असल्याने शाळकरी मुलेदेखील व्यसनाच्या आहारी गेली आहेत. पोलीस व अन्न-औषध प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे. फैजपूरसह सावदा या ठिकाणी गुटखा विक्री करणारे व्यापारी आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री होते. हे व्यापारी फैजपूर शहरासह शहराला लागून असलेल्या सर्व खेड्यांमध्ये गुटखा पोहोचवण्याचे काम करतात. गुटखा विक्रीतून रोज लाखो रुपयांची उलाढाल होते.