फैजपूर । शहरात मुख्य चौक तसेच पानटपर्यांवर, पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सर्रासपणे अवैध सट्टा, बेटींग सुरु असताना पोलीसांनी 2 रोजी मटका बेटींगवर केवळ दोन जणांना ताब्यात घेऊन केवळ कारवाईचा देखावा केला आहे. तसेच घरफोड्या व किरकोळ चोरट्यांनी देखील डोकेवर काढले असून पोलीस प्रशासन मात्र केवळ बघ्याची भुमिका घेत असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घरफोड्यांच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये भिती
शहरात मुख्य सुभाष, श्रीराम चित्रपटगृह, सद्गुरु टुरींग टॉकीज, छत्रीचौक, बसस्थानक अशा गजबजलेल्या ठिकाणी मटका बेटींग सुरु आहे. तसेच विशेेष म्हणजे फैजपूर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चार ठिकाणी पानटपरीत मटका घेतला जातो. याठिकाणी शाळा आहे. मात्र पोलीसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. फैजपूरसह परिसरातील 28 गावांमध्ये मटका बेटींग खुलेआम सुरु आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये शहरात 20 ते 22 ठिकाणी घरफोड्या सारखे गंभीर गुन्हे घडलेले आहेत. एपीआय दत्तात्रय निकम यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी पदभार सांभाळले असून त्यांच्या कारकिर्दीत घरफोड्या झालेल्या आहेत. पोलीसांनी दोन आरोपी पकडून कारवाईचा देखावा केला. लक्ष्मीनगरात गेल्या दोन आठवड्यापासून दररोज चोरट्यांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. मात्र आतापर्यंत दहा ते बारा घरफोड्या झालेल्या आहेत. 1 जुलैच्या रोजी रात्री 9 वाजताच अज्ञात चोरटे या ठिकाणी आले. व त्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक रहिवाशांच्या सतर्कतेने चोरटे पसार झाले. नेहमीच्या या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.