फैजपूर शहरात बेशिस्त वाहतुकीची डोकेदुखी

0

फैजपूर । शहरातून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर मार्गावरील सुभाष चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि बसस्थानक परिसरात रहदारीस प्रचंड वाढ झाली असून बेशिस्त वाहने व प्रवासी वाहतुकदारांनी विळखा घातला आहे. अवैध प्रवासी वाहतूक बोकाळल्यामुळे सध्या या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. बेशिस्त झालेल्या या चौकांना कोतवाली आहे किंवा नाही, अशी शंका येते. बसस्थानकात शिरणार्‍या व बाहेर पडणार्‍या चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे बेशिस्त वाहतूक ही एकप्रकारे नागरिकांची डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येते.

रहदारीतून मार्ग काढतांना होतात अपघात
मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांना जोडणारा महत्वाचा मार्ग असल्याने अंकलेश्वर-बर्‍हाणपूर मार्गावर माल वाहतूक करणार्‍या अवजड वाहनांची संख्या अधिक असते मात्र गेल्या काही काळापासून याच मार्गावरुन भुसावळ, यावल, आणि रावेरकडे जाणार्‍या खाजगी प्रवासी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रवाशांची पळवा-पळवी करण्यासाठी खाजगी वाहनधारक मिळेल त्या ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध वाहने उभी करतात. त्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीचा अनेक ठिकाणी खोळंबा होत आहे. वाढत्या रहदारीतून मार्ग काढतांना लहान-मोठे अपघात होतात. त्यातून वाहनधारकांमध्ये वाददेखील उद्भवतात. गेल्या आठवड्यात म्युनिसीपल हायस्कूलचे दोन विद्यार्थी वाहनाच्या धक्क्याने किरकोळ जखमी झाले होते. त्यावर उपाययोजना म्हणून वाहनधारकांवर किरकोळ कारवाई झाली त्यानंतर परिस्थिती ‘जैसे-थे’ झाली आहे.