फैजपूर शहरात मुलभूत सुविधांअभावी जनजीवन झाले विस्कळीत

0

फैजपूर (मयुर मेढे)। शहरात पालिकेकडून विविध विकासकामे करण्याचा गवगवा केला जात असला तरी, शहरातील काही नवीन वस्त्यांमध्ये अद्यापही गटारी व रस्त्यांचा अभाव असल्याने विकासकामांचा पालिकेला विसर पडला आहे. या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत आहे. फैजपूर शहराच्या चहूबाजूला गेल्या 15 वर्षाच्या कार्यकाळात विविध नवीन रहिवासी वस्त्या अस्तित्वात आल्या. बोटावर मोजण्या इतक्या नवीन रहिवासी वस्त्या वगळता इतर वस्त्यांमध्ये रस्ते, गटारी अशा अत्यावश्यक नागरी सुविधांचा अभाव आहे.

गटारींअभावी वाढले शोषखड्डे
या वस्त्यांमधील नागरिक पाणीपट्टी, घरपट्टी कर भरत असले तरी त्यांना अत्यावश्यक नागरिक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी जनशक्ती कॉलनीतील उद्यानापासून गेलेल्या रिंगरोडच्या कामावर लाखो रुपयांचा निधी खर्च करुन काम करण्यात आले. मात्र या रिंगरोड लगत गटारी बनवण्यात आलेल्या नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना दैनंदिन वापराचे सांडपाणी निचरा करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहे. नाईलाजाने रहिवाश्यांना पर्याय म्हणून शोषखड्डे करावे लागले आहे.

दुर्गंधीयुक्त वातावरणाने आरोग्य सापडले संकटात
शोष खड्ड्यातील पाणी निचरा अभावी वर आल्यानंतर दुर्गंधीयुक्त वातावरण नित्याने होत असते. त्याचबरोबर काही नवीन वस्त्यांमध्ये हीच परिस्थिती असल्याने नगरपालिकेने शहरविकास कामांचा केवळ गव-गवा न करता रस्ते, गटारी, दैनंदिन साफसफाई या विषयी गंभीर दाखल घेवून मुलभूत नागरिक सुविधा पासून वंचित असलेल्या नवीन रहिवासी वस्त्यांमध्ये रस्ते, गटारी या सुविधा उपलब्द करून देण्यासाठी पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. अशी जोरदार मागणी होत आहे.

कागदोपत्री स्वच्छता
स्वच्छता अभियानांतर्गत शहर स्वच्छतेचा पालिकेकडून देखावा करण्यात आला. प्रत्यक्षात या अभियानाची अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र विविध भागांमध्ये दिसून येत आहे. त्यासाठी कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी यांनी लक्ष घालून दैनंदिन साफसफाई व रस्ते, गटारी अशा मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा.

गटारी तुंबल्या
शहरात नवीन रहिवासी वस्त्यांमध्ये गटारी आहे त्या भागांमध्ये गटारीतील ओला कचरा दैनंदिन साफ-सफाईच्या माध्यमातून काढला जात नाही. त्यामुळे या गटारीत सांडपाण्याने तुडूंब भरलेल्या असतात. ओला कचरा काढला गेला तर तो लवकर उचलला जात नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली असून शहरात साफसफाईचे तीन-तेरा झाले आहे.

डास-मच्छर यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेकडे धूर मशीन उपलब्ध आहे. मात्र, या मशीनचा वापर प्रत्यक्षात केला जात नाही. वेळप्रसंगी धूर मशीन वापरासाठी लागणारे पेट्रोल उपलब्ध नसते. बीएसी पावडर फवारणी सुद्धा केली जात नाही. त्यामुळे डास व मच्छरांचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने साथीचे आजारांचा फैलाव होण्याची भीती निर्माण झाली आहे.