फैजपूर शहरात लॉकडाऊनचा फज्जा ; गांभीर्य शून्यतेचे दर्शन

0

फैजपूर: कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जनता कर्फ्यु पाठोपाठ लॉकडाऊन आणि आता संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. मात्र नागरिक याविषयी फारसे गांभीर्याने घेत नसल्यामुळे काही ठिकाणी पोलिस दंडुकेशाहीचा वापर तर उठबश्या काढण्याची शिक्षा देत आहेत. तालुका प्रशासनातील अधिकारी गस्तीवर आहेत. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी विनाकारण बाहेर निघणाऱ्या वाहनचालकांच्या वाहनाची हवाच सोडली. प्रांताधिकारी हे सकाळ पासूनच फैजपूर,यावल रावेर फिरत आहे. जिल्ह्यासह राज्यात संचारबंदी लागू असताना नागरिक पूर्णपणे निष्काळजीपणाने रस्त्यावर वावरतांना दिसत आहे. वाहनांची गर्दी सकाळपासून फैजपूर शहरांमध्ये दिसून येत आहे.

भाजीपाला विक्रेते आदेशाला जुमानत नाही
शहरात बाजार न भरण्याचे आदेश असून देखील काही किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी बाजार भरून ठेवला आहे. आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसून येते. बाजारासाठी हात गाडीवरती भाजीपाला ठेवून वाड्यात, कॉलनीत फिरण्याचे आदेश मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिलेले आहे तरीसुद्धा आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसते.

दै ‘जनशक्ती’चे आवाहन
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यु लॉकडाऊन करूनही नागरिक घराबाहेर पडत आहे. कोरोना या जीवघेणा आजाराचे नागरिक गांभीर्य लक्षात न घेता बिनधास्त पणे गावात फिरत आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतः व परिवारासह घरातच थांबून स्वतःची काळजी घ्यावी विनाकारण घराच्या बाहेर गावातील नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन दै जनशक्ती तर्फे करण्यात येत आहे.