फैजपूर। शहरात राबविण्यात आलेल्या हगणदारी मुक्तीचा पूर्णपणे फज्जा उडाला असून, शहरातील उघड्यावर शौचविधी करण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने भारत स्वच्छ अभियान केवळ नावापुरते उरले असल्याने प्रमुख रस्त्यांवरील घाणीच्या साम्राज्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या परिसरात निर्माण झाले घाणीचे साम्राज्य
फैजपुर शहरात चौफेर महिला व पुरुषांचे सार्वजनिक शौचालये असतांना सुद्धा योग्य व नियमित साफसफाई अभावी नागरिक उघड्यावर शौचविधीची संख्या लक्षणीय झाली होती. न्हावी दरवाजा जवळील खंडोबा देवस्थान मार्ग, कळमोदा रोडवरील पुल, लक्कडपेठ भागाखालील धाडी नदी पुलावर, सुभाष चौक लगतच्या धाडी नदी पुलाजवळ आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण दिसून येते.
मुख्याधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती झाली उगत दिड वर्षापुर्वी हगणदारीमुक्तीसाठी वैयक्तिक शौचालय योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत 495 वैयक्तिक शौचालयासाठी शासनाचा 50 लाखाचा निधी खर्च करुन लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्याचा लाभ देण्यात आला. शासनाच्या मुदतीत वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट पालिकेने पूर्ण केल्याने नाशिक विभागात फैजपुर पालिकेने ही योजना उत्कृष्टपणे राबविल्याने मुख्यमंत्र्यांच्याहस्ते पालिकेला गौरविण्यात आले होते. मात्र, आता पालिकेच्या कर्तव्य कठोर मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्या व सफाई विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परिस्थिती उलट झाली आहे.
अशीही चमकोगिरी
शासनाची चौकशी समिती पाहणीसाठी येण्याआधी चार-पाच दिवसांपूर्वी कर्मचार्यांसह मुख्याधिकारी स्वत: या भागात उघड्यावरील शौचास मनाई म्हणून गुड मॉर्निंग पथक फिरवून रिक्षाद्वारे जाहिर दवंडी देऊन जनजागृतीवर भर देण्यात आला. त्यामुळे उघड्यावर शौचालयावर काही दिवस निर्बंध बसले. नंतर परिस्थिती ’जैसे-थे’ अशी निर्माण झाली. चमकोगिरी करुन चौकशी समितीला शंभर टक्के हगणदारी मुक्तीचा देखावा करुन दाखविण्याची शक्कल प्रत्येक वेळी लढविण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात हगणदारी मुक्तिपासून शहर पलीकडे आहे. अशी स्थिती याठिकाणी निर्माण झाली असून, वैयक्तिक शौचालय योजना राबविण्यासाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च केला गेला असला तरी, उघड्यावरील शौचालयावर निर्बंध बसविणे पालिकेला शक्य झाले नाही. याला जबाबदार कोण? असा प्रश्न पुढे येत आहे.