फैजपूर : कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नगराध्यक्ष महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, जेष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी, नगरसेवक शेख कुर्बान, जितेंद्र भारंबे व नगरसेवक यांच्या पुढाकाराने पालिकेतर्फे शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी निर्जंतूकीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाच्यावतीने ब्लिचींग आणि सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी केली जात आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डातील गल्लीबोळात फवारणीसाठी तीन नवीन हँड पंप उपलब्ध करून देण्यात आले असून प्रत्येक वार्डातही फवारणी केली जात आहे.
देशभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे.
फैजपूरात सोशल डिस्टन्सचा अनुभव
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने उपाययोजना म्हणून निर्बंध लादले आहे. शासकीय कार्यालये, बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणी ब्लिचींग आणि सोडीयम हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. किराणा दुकान, बँका यांच्यासमोर एक मिटरचे सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्स) चा प्रभाव जाणवला. नागरीक आखून दिलेल्या चौकटीतच व्यवहार करीत होते. असे असलेतरी शहरातील गल्ली-बोळांमध्ये नागरीकांना या आजाराचे गांभीर्य दिसून आले नाही. गल्लीबोळात नागरीक घोळक्या-घोळक्याने उभे होते. यावरही पोलिसांनी कडक पाऊले उचलावी अन्यथा फैजपूर शहरातील परीस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, अशी भीतीही व्यक्त होत आहे.