फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर केले अत्याचार

0

रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


जळगाव : महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना मित्र असलेल्या एकाने सोबत फिरायला गेले असतांनाचे काढलेले छायाचित्र सोशल मिडीयावरुन व्हायरल करण्याची धमकी देवून संबंधित 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एवढ्यावर संबंधित तरुण थांबला नाही तर त्याने माझ्याशी लग्न कर नाहीतर एक लाख रुपये दे अशीही मागणी केली. प्रकाराला कंटाळलेल्या तरुणीने गुरुवारी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून संबंधित तरुणाविरोधात तक्रार दिली. त्यावरुन योगेश लोंढे (रा.कंजरवाडा, जळगाव) याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीशी वाद झाल्यावर माहेरी राहते तरुणी

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील 19 वर्षीय तरुणीची 2016 मध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तेथे शिक्षण घेत असलेल्या योगेश लोंढे विद्यार्थ्याशी तिची ओळख निर्माण झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. या मैत्रीतून योगेश याने प्रेमाचा प्रस्ताव ठेवला, मात्र तरुणीने लग्न झालेले असल्याने प्रेमास नकार दिला. मात्र त्यानंतर योगेश याने कोल्हे हिल्स परिसरात भेटण्यासाठी बोलावले असता तेथे त्याने मुंबईला फिरायला गेले तेव्हाचे तसेच कोल्हे हिल्स येथील सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने घरी काहीच सांगितले नाही, मात्र त्यानंतरही त्याचा त्रास सुरुच होता.

तरुणीच्या भावालाही फोटो पाठवून धमकी

तरुणी दोन वर्षापासून पतीपासून विभक्त राहत असल्याने योगेश याने तरुणीच्या मागे प्रेम आणि लग्नासाठी तगादा लावला होता. त्याला तरुणीने विरोध केला, त्यामुळे योगेश याने तरुणीच्या भावाच्या मोबाईलवर फोटो पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. माझ्याशी लग्न करायला लाव नाही तर एक लाख रुपये तेव्हाच मी तिला सोडेल असे तो धमकावू लागला. त्रास असह्य झाल्याने पीडित तरुणीने गुरुवारी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तेथे योगेश याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, मात्र घटनास्थळ तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा रात्री तिकडे वर्ग करण्यात आला.