फोडाफोडीमुळे राजकीय गणिते बदलणार!

0

हडपसर । मांजरी बुद्रुक व शेवाळवाडी या दोन्हीही गावांचा पालिका हद्दीत समावेश न झाल्यामुळे निवडणूक लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासूनच प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही कार्यकर्त्यांचा दल बदलही झाला. या आयातीमुळे काही प्रभागांमध्ये गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाटाघाटी, माघार आणि एकमेकांना शुभेच्छा देत मांजरी बुद्रुक व शेवाळवाडी येथील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. परस्परविरोधी दोन्हीही पॅनेलच्या प्रचाराचे नारळ फुटून विकास कामांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात झाली आहे. वीज, पाणी, कचरा, वाहतूक अशा जुन्याच प्रश्‍नांची नव्याने उकल मांडण्याचा प्रयत्न प्रमुखांसह उमेदवारांकडूनही होऊ लागला आहे.

सरपंच पदाकडे लक्ष
मांजरी-महादेवनगरचा पाणी, कचरा व वाहतूक प्रश्‍न तसेच गावाचा पालिका प्रवेश व भविष्यातील नियोजन अशा मुद्यांवर येथील निवडणूक रंगणार आहे. सरपंच पद थेट जनतेतून असल्याने दोन्हीही पॅनेलकडून त्यावरच अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. एक मोठी ग्रामपंचायत, सहकार व राजकीय क्षेत्रात कायमच मोठे योगदान असलेल्या व्यक्ती म्हणून याही ग्रामपंचायतकडे जिल्ह्यातील मातब्बरांचे लक्ष लागते आहे. रोजगाराच्या निमित्ताने बाहेरून आलेला मोठा वर्ग महादेवनगरमध्ये स्थायिक झाला आहे. येथे सुमारे साडेसात हजार मतदार आहे. येथील पाणी प्रश्‍न नागरिकांच्या जिव्हाळ्याचा झालेला आहे. त्यांच्या या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर देणारा उमेदवार त्यांची मते घेण्यात यशस्वी ठरेल, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.

मातब्बरांचे निवडणूकीकडे लक्ष
शेवाळवाडीच्या पोटनिवडणुकीसाठी 50 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 28 जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे दोन्ही पँनेलचे अकरा-अकरा उमेदवार येथे एकमेकांसमोर लढणार आहेत. गावातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आजी-माजी जिल्हा पदाधिकारी पॅनलच्या निमित्ताने एकमेकांसमोर ठाकले आहेत. त्यामुळे परिसराबरोबरच जिल्ह्यातील मातब्बर या गावच्या निवडणूकीकडे कुतुहलाने लक्ष ठेवून आहेत. ग्रामपंचायतचा पालिका प्रवेश, प्राथमिक सुविधा आणि भविष्यातील गावाचे सुनियोजन या प्रश्‍नांची उत्तरे उमेदवारांना द्यावी लागणार आहेत.

17 जागांसाठी 46 जण रिंगणात
मांजरी बुद्रुक येथे सरपंच पदासाठी 11 तर सदस्य पदासाठी 96 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सरपंच पदाच्या शर्यतीतून आठ जणांनी काढता पाय घेतला असून तीन जण रिंगणात उतरले आहेत. सदस्य पदासाठीच्या शर्यतीतून 50 जणांनी माघार घेतली असून 17 जागांसाठी 46 जण रिंगणात आहेत. प्रमुख दोन पँनेलसह महादेवनगर व चारवाडा या दोन ठिकाणी अपक्षांनी आघाडी केली आहे. ही आघाडी दोन्हीही प्रमुख पँनेलला आव्हान देणार असल्याची चर्चा आहे.

कार्यकर्त्यांचा दल बदल
मांजरी बुद्रुक व शेवाळवाडी या दोन्हीही गावांचा पालिका हद्दीत समावेश न झाल्यामुळे निवडणूक लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही कार्यकर्त्यांचा दल बदलही झाला. या आयातीमुळे काही प्रभागांमध्ये गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.