वॉशिंग्टन । जर्मनीचा हुकमशहा अॅडाल्फ हिटलर याने वापरलेल्या एका फोनला अमेरिकेत झालेल्या लिलावादरम्यान सुमारे अडीच कोटी डॉलर्स इतकी किंमत मिळाली आहे. दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान ज्या बंकरमध्ये हिटलरने आत्महत्या केली होती त्या बंकरमध्ये हा फोन सापडला होता. शेवटच्या दिवसांमध्ये आदेश देण्यासाठी हिटलरने या फोनचा वापर केला होता असे बोलले जात आहे. अमेरिकेतील अॅलेक्झांडर हिस्टॉरिकल ऑक्शन्स या संस्थेने मेरीलँड येथे या फोनचा लिलाव मांडला होता. मात्र या फोनच्या खरेदीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. लिलाव पुकारणार्या कंपनीचे उपाध्यक्श आंद्रियास कॉर्नफेल्ड म्हणाले की हा फोन उत्तर अमेरिकेतील एका संग्राहकाने खरेदी केला आहे. जर्मनीच्या सिमेन्स कंपनीने बनवलेला हा फोन 1945 पासून इंग्लंडमध्ये एका ब्रिफकेसमध्ये ठेवण्यात आला होता. दोस्त राष्ट्रांनी बनवलेल्या यादीत या फोनचा उल्लेख सार्वकालीन विनाशकारी हत्यार म्हणून करण्यात आला होता.