फोन करून त्रास देणार्‍या चौघांवर गुन्हा

0

हिंजवडी : महिलेला वारंवार फोन करून तसेच तिच्या व्हाट्स अ‍ॅपवर मेसेज पाठवून शरीरसुखाची मागणी करणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. 4) या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी एका 32 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाळासाहेब प्रभाकर चव्हाण (वय 29, रा. चाकण) व जालिंदर नानाभाऊ कुलगुडे (वय 28, रा. आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर बाप्पा प्रभाकर चव्हाण याच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला वेळोवेळी मोबाईलवर फोन करून मानसिक त्रास दिला. तेच व्हाट्स अ‍ॅपवर अश्‍लील मेसेज पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास आरोपींनी महिलेस जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर भेदरलेल्या महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर करीत आहेत.