सणसवाडी । शिरूर तालुक्याच्या सणसवाडी येथील वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. भारतीय कामगार सेनेच्या मार्गदर्शनाखाली 9 सप्टेंबरपासून ते कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणाला बसले होते. बुधवारी अखेर कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांच्या प्रतिनिधींशी सकारत्मक चर्चा झाली. त्यात कामगारांच्या बर्याच मागण्या मान्य करण्यात आल्या. कंपनीचे कार्यकारी संचालक व मालक अरुण जिंदाल, संचालक एम. मुकुंदन, एस. सुरेश, गोपालकृष्ण दंडवते यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन सोडण्यात आले.
कंपनीतील 45 कामगारांनी वेतन वाढीचे तसेच त्यांच्या विविध मागण्यांचे मागणीपत्र कंपनी व्यवस्थापनाकडे सादर केले होते. मागणीपत्र सादर करून देखील कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केले होते.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष योगेश ओव्हाळ, शिवसेनेचे माजी क्रीडामंत्री उत्तम प्रकाश खंदारे, कामगार सेनेचे रघुनाथ कुचिक, पी. आय. रमेश गलांडे, मनसे तालुका प्रमुख कैलास नर्के तसेच महिला कार्यकर्त्या सणसवाडी उद्योग नगरीतील 20 कामगार संघटना, महिला मंडळाने याची दखल घेतली. कंपनी व कामगार यांच्यात सामंजस्य करण्यासाठी भारतीय कामगार संघटनेचे राज्य सदस्य अशोक हरगुडे, सरपंच रमेश सातपुते, माजी उपसरपंच बाबासो दरेकर, विद्यादर दरेकर, सोमदादा शेळके, कामगार नेते राजेंद्र दरेकर आदींनी कामगारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी व्यवस्थापनाशी संवाद साधला. तीन वर्षांसाठी 7800 रुपयांची पगारवाढ देण्यात आली. या शिवाय बस फॅसिलिटी, मेडिक्लेम पॉलिसीत वाढ, तसेच बोनस वाढ करण्यात आली. याबरोबर अनेक मागण्या ही मान्य करण्यात आल्या. युनियन अध्यक्ष सचिन वाळके, उपाध्यक्ष गणेश मोरे, संदीप साबळे, सागर सोनवणे, कंपनीचे एच. आर. मॅनेजर योगेश राजहंस, माजी पंचायत समिती उपसभापती आनंदराव हरगुडे आदी उपस्थित होते.