फौजदारास मारहाण ; दोघा आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी

0

भुसावळ- राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगर समोर राख भरण्यासाठी उभ्या राहणार्‍या बल्कर महामार्गावरून बाजूला करीत असताना तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानन करेवाड यांना मारहाण झाल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजता घडली होती. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेतील आरोपींना सोमवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

फौजदाराला धक्काबुक्कीनंतर सात बल्कर जप्त
दीपनगर प्रकल्पातील राख भरण्यासाठी राज्यभरातून बल्कर येतात मात्र ही वाहने राष्ट्रीय महामार्गावर उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पोलिसांकडून सूचना दिल्यावरही चालक ऐकत नसल्याने रविवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या सूचनेवरून डीवायएसपी गजानन राठोड यांनी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड व त्यांच्या सहकार्‍यांना तसेच शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले व त्यांच्या सहकार्‍यांना रस्त्यावरील बल्करवर कारवाई करीत रस्ते मोकळे करण्याच्या सूचना करण्यात आल्या. रस्त्यावर एकही बल्कर दिसायला नको अश्या सक्त सूचना अधिकार्‍यांना दिल्या होत्या त्यामुळे रविवारी सकाळी 11 वाजता कारवाई करीत असताना उपनिरीक्षक गजानन करेवाड यांना अमन जगबीदर सुनसोये (26, रा.निंभोरा, ता. भुसावळ) आणि कुलदिप एकनाथ महाले (34, रा. रा. समता नगर, रेल्वे हॉस्पीटलमागे, भुसावळ) यांनी मारहाण केल्याने त्यांच्या डाव्या गालास व डाव्या हाताच्या करंगळीस मार लागला होता. या प्रकारानंतर पोलिसांनी दोघाही आरोपींना ताब्यात घेत सात बल्कर लागलीच जप्त केली.

आज बल्करबाबत दोषारोपपत्र दाखल करणार
पोलिसांच्या पथकाने दीपनगरसमोर उभ्या असलेल्या सात बल्कर वाहनांना जप्त केले असून मंगळवारी भुसावळ न्यायालयात याबाबत दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर केले जाणार असून त्यानंतर संबंधित वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले.