अमळनेर । येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील फ्रँकिंग मशीन तब्बल 11 वर्षापासून बंद पडले होते. 2006 मध्ये मशिन खराब झाल्याने वेळोवेळी दुरुस्तीची मागणी करुन देखील मशिन दुुरुस्तीचे काम झाले नाही. याच मशिनमध्ये सहा कोटी 67 लाख 89 हजार 815 अडकून पडले आहेत. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ आहे. तेलगीचा बनावट मुद्रांक घोटाळा उघडकीस आल्यानंतर शासनाने फसवणूक व शासनाची लूट थांबण्यासाठी ऑनलाईन मुद्रांक पद्धत म्हणजे फ्रँकिंग मशीन चा वापर सुरु केला होता. 2003 मध्ये अमळनेर दुय्यम निबंधक कार्यालयात फ्रँकिंग मशीन दिले होते. पुणे येथील खाजगी कंपनीतर्फे स्टेशनरी आणि सेवा सहित हे मशीन पुरवण्यात आले होते.
शासनाने देखील कोटयवधी रुपये या मशीनद्वारे डिजिटल पद्धतीने पुरविले होते. त्यानंतर खरेदी विक्री व्यवहारातून मुद्रांक स्वरूपात ते कापले जात होते . 2006 र्पयत मशीन सुरळीत सुरू होते. मुद्रांकाच्या तुटवडयावेळी या मशिनची मदत होत होती. 2006 मध्ये मशीन खराब झाले वेळोवेळी दुरुस्तीची मागणी करूनही दुरुस्त झाले नाही. दरम्यानच्या काळात फ्रँकिंगद्वारे ही फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने पाच हजार रुपयांपेक्षा पेक्षा जास्त मुद्रांक किमतीचे व्यवहार या द्वारे करू नये असे निर्देश दिले. अमळनेर कार्यालयात दरम्यानच्या काळात 3 ते 4 अधिकारी बदलून गेल्याने फ्रँकिंग मशीन धूळ खात पडून आहे. त्यातील 6 कोटी 67 लाख 89 हजार 815 रुपयांची रक्कम तशीच अडकून पडली आहे. या रकमेचा वापरच न झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या दुय्यम निबंधक पदी कुमार मावळे कार्यरत आहे.