फ्रान्समध्ये सापडली स्फोटकांची भूमिगत प्रयोगशाळा

0

फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात स्फोटकांची भूमिगत प्रयोगशाळा सापडल्यामुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी यासंदर्भात तीन जणांना अटक केली आहे. राजधानी पॅरिसच्या जवळ असलेल्या विला ज्युईफ या भागात स्फोटक पदार्थांची एक भूमिगत प्रयोगशाळा सापडली आहे, अशी घोषणा फ्रान्सचे गृहमंत्री गेरार्ड कोलोम्स यांनी केली. एका अज्ञात व्यक्तीने माहिती पुरवल्यामुळे बुधवारी सुरक्षा यंत्रणांनी एका इमारतीवर छापा टाकला.

त्यावेळी या प्रयोगशाळेचा ठावठिकाणा सापडला, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रयोगशाळेत टीएटीपी नावाचे स्फोटक पदार्थ सापडले आहेत. त्यांचा वापर सामान्यपणे इसिसचे दहशतवादी गट करतात तसेच या ठिकाणी काही बॉम्ब आणि रासायनिक पदार्थ सापडले आहेत, असेही त्यांनी सांगितले. मात्र, फ्रान्सच्या पोलिसांनी याबाबत फारशी माहिती न देता केवळ तीन जणांना अटक केल्याचे सांगितले आहे. मात्र, या लोकांचा सीरियातील दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.