पुणे । पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी बुधवारी फ्रेंच डेव्हल्पमेन्ट एजन्सीच्या शिष्टमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाची पाहणी केली. या पाहणीनंतर फ्रेंच डेव्हल्पमेंट बँक पुण्याच्या मेट्रो प्रकल्पासाठी अठराशे कोटी रुपयांचे (245 मिलियन युरो) कर्ज देण्याची शक्यता आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
यावेळी फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीच्या शिष्टमंडळातील संचालक निकोलस मायकल बर्नाड, वाहतूक विभाग प्रकल्पाचे प्रमुख मॅथ्यु वेरडूर, प्रकल्प प्रमुख रजनीश आहुजा, महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम उपस्थित होते. फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीच्या शिष्टमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पात असलेल्या शिवाजीनगर न्यायालय ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते रेंजहिल्स या मार्गाची पाहणी केली. याबरोबरच मेट्रो कास्टिंग यार्ड आणि ज्या ठिकाणी व्हाया डक्ट टेंडर काम सुरू असते, त्या भागांची पाहणी केली.
पुणे मेट्रो प्रकल्पाचा खर्च 11, 420 कोटी रुपये असून त्यातील निम्मा खर्च केंद्र, राज्य सरकार व महापालिका करणार आहेत. तर उर्वरित निधी कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सहा हजार दोनशे कोटी रुपयांच्या कर्जापैकी साडेचार हजार कोटी रुपये देण्याची तयारी युरोपियन इन्व्हेस्टमेंटने दाखवली आहे. तर उर्वरित अठराशे कोटी रुपये फ्रेंच डेव्हलपमेंट बँक देण्यास इच्छुक आहेत.