आतापर्यंतची सर्वात महागडी लढत
लासवेगास । द मनी फाईट म्हणून संबोधल्या गेलेल्या, जगातील सर्वात महागड्या लढतीत सुपरस्टार बॉक्सर फ्लॉयड मेवेदरने इतिहास रचताना टेक्निकल नॉटआउट ओवर (टीकेओ) द्वारे 29 वर्षीय आयरिश बॉक्सर कोनोर मॅक्ग्रेगॉरला 10 व्या फेरीत मात दिली. 40 वर्षीय मेवेदरचा हा व्यावसायिक बॉक्सिंगमधला सलग 50 वा विजय आहे. निवृत्तीनंतर पुन्हा दोन वर्षांनी बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करणार्या मेवेदरने आतापर्यत जिंकलेल्या 50 सामन्यांपैकी 27 लढतीत नॉकआऊटमध्ये जिंकल्या आहेत.
अनुभवी मेवेदरने सामन्यातील सातव्या फेरीपासून आपला रंग दाखवण्यास सुरूवात केली. त्यानंतर आक्रमक खेळ करत त्याने कोनोरवर वर्चस्व मिळवले. सामन्यातील 10 व्या फेरीत पोहचेस्तोवर कोनोरचा श्वास फुलायला लागल्याने पंचानी लढत मध्येच थांबवत मेवेदरला विजयी घोषीत केले. विजयानंतर मेवेदर म्हणाला की, कोनोरने माझ्या अपेक्शेपक्शा चांगला खेळ केला. प्रत्येक फेरीत त्याने वेगवेगळे डावपेच खेळले, पण शेवटी मी जिंकलो. जास्तित जास्त काळ सामना लांबवायचा आणि शेवटी त्याला नॉक आऊट करायचे अशी आम्ही रणनिती आखली होती. व्यावसायिक बॉक्सिंगमधील शेवटची लढत योग्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळल्याचे समाधान आहे. सामन्यानंतर कोनोर म्हणाला की, ही लढत तुल्यबळ होती. थकल्यामुळे माझ्या हालचाली मंदावल्या. पण ते ताकदवान होते हे मान्य करायला पाहिजे. त्यांच्याविरुद्ध पुन्हा खेळू शकेल की नाही हे माहित नाही.
3 हजार 832 कोटींचा सट्टा
या लढतीवर सुमारे 3 हजार 832 कोटी रुपयांचा सट्टा खेळला गेला. व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला गेला, असे एमएमए अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशीपचे मुख्य कार्यकारी डाना वाइट यांनी सांगितले.
या सामन्यासाठी भारतीय चलनात 6,400 रुपयांपासून 16 हजार रुपयांपर्यंतचे तिकीट लावण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी घोषणा करण्यात आलेल्या या सामन्याचे जगभरात 200 देशांमध्ये थेट प्रसारण करण्यात आले होते. जगभरात एक अब्ज लोकांनी हा सामना पाहिला.