गोळीबारात 17 ठार, 14 जण जखमी, आरोपी अटक
पार्कलंड । अमेरिकेतील साऊथ फ्लोरिडाच्या डगलस हायस्कूलमध्ये बुधवारी एका माजी विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केला. त्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुमारे 14 जण जखमी झाले आहेत. आरोपी निकोलस क्रूजचे वय 19 वर्षे आहे. तो याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे. आरोपी विद्यार्थ्याला शिस्तभंगामुळे शाळेतून काढून टाकण्यात आले होते, त्यामुळे तो रागात होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून, घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आधी शाळेचा फायर अलार्म वाजवला. त्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. त्या गोंधळाचा फायदा घेत त्याने अंदाधुंद गोळीबार केला. घटनेमध्ये ठार झालेल्या 12 जणांचा मृत्यू शाळेत तर दोघांचा इमारतीबाहेर झाला. एका व्यक्तीने रस्त्यावर तर दोन जखमींनी रुग्णालयात प्राण गमावले. पोलिसांच्या मते, आरोपी विद्यार्थ्याने या घटनेमध्ये एआर 15असॉल्ट रायफलचा वापर केला होता. या घटनेनंतर आरोपी विद्यार्थ्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही तर उलट शांतपणे शरणागती पत्करली. आरोपी क्रूजने आधी शाळेबाहेर गोळीबार केला, त्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो इमारतीत घुसला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला शोक
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी घटनेबाबत ट्वीट करून शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले फ्लोरिडातील गोळीबारातील पीडितांबरोबर माझ्या संवेदना आहेत. एका गन कंट्रोल ग्रुपच्या माहितीनुसार अमेरिकेच्या शाळांमध्ये गोळीबार होण्याची ही 18 वी घटना आहे. त्यात आत्महत्या आणि अशाही घटनांचा समावेश आहे ज्यात हानी झाली नाही. जानेवारी महिन्यातच बेनटॉनजवळच्या एका शाळेत एका 15 वर्षीय तरुणाने केलेल्या गोळीबारात 2 ठार झाले होते. जगभरातील एकूण गन्सपैकी 48% केवळ अमेरिकन्सकडे आहे.
गन कल्चर संपवण्यासाठी रडले होते ओबामा
दोन वर्षांपूर्वी ऑरेगॉनच्या कॉलेजमध्ये नऊ जणांची हत्या केल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना रडू कोसळले होते. ते म्हणाले होते, जर आज आपण पावले उचलली नाहीत, तर अशा घटना थांबणार नाही. या मुलांबद्दल विचार करून मी वेडा होतो. आपण गन पॉलिसी आणायला हवी. पण अमेरिकन संसदेतील 70 टक्के खासदार गन कल्चरच्या समर्थनात होते. त्यामुळे ओबामांचा नाइलाज झाला.