पुणे । आपल्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशच्या वतीने देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 22 ऑगस्टला बँक कर्मचार्यांनी देशव्यापी संप पुकारला असून 15 सप्टेंबरला लोकसभेवर महामोर्चा काढणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुणे जिल्हा बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक पाटील, नंदकुमार चव्हाण, ललीता जोशी उपस्थित होते.
बँकांचे खासगीकरण, विलिनिकरण व बचत खात्यावरील व्याजदराला लावलेली कात्री हे निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी योग्य नाहीत. याशिवाय हेतुतः थकीत कर्जदारावर गुन्हा दाखल करावा, त्यांना बँकांच्या नाहरकतीशिवाय निवडणुका लढवण्याची परवानगी देऊ नये, अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली 10 लाख कर्मचारी एक दिवसीय संपावर जाणार आहेत. तर 15 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे लोकसभेवर महामोर्चा काढणार आहेत, असे तुळजापूरकर यांनी सांगितले.
सरकार सार्वजनिक बँकांच्या खासगिकरणाचा अजेंडा राबवत आहे. त्याला आमचा विरोध आहे. सरकारने बड्या थकीत कर्जदारांची नावे घोषित करावीत. त्यांना निवडणूक लढवण्यापासून मज्जाव करावा. तसेच महाराष्ट्रातील 100 बड्या थकीत कर्जदारांच्या विरोधात त्यांच्या घर किंवा ऑफिससमोर सप्टेंबरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा तुळजापूरकर यांनी यावेळी दिला.