भुसावळ । केंद्र शासनाने राष्ट्रीयकृत बँकांच्या सहाय्याने सुशिक्षित तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध शासकिय योजना अंमलात आणल्या आहे. मात्र याच योजनांच्या संदर्भात शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्ज प्रकरणात अनेक घोटाळे होत असल्यामुळे यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विवेक नरवाडे यांनी केली आहे. यासंदर्भात नरवाडे यांनी जनहित याचिका दाखल करुन उपोषण करण्याचा इशारादेखील दिला आहे.
माहिती देण्यास केली जाते टाळाटाळ
शासनाने उदात्त हेतूने सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी स्वतःचे उद्योग सुरु होण्यास प्रोत्साहन म्हणून मुद्रा योजना सुरु केली. परंतु या योजनेच्या नावाखाली दलालांचा सुळसुळाट वाढला असून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मुद्रा योजनेत घोटाळे हेात आहे. खर्या गरजू लाभार्थ्यांना या योजनेचे लाभ मिळत नसून दलालांचा बँकेभोवती नेहमीच गराडा असतो. बँक व्यवस्थापकांशी आर्थिक व्यवहार करुन दलाल आपले कर्ज प्रकरण लागलीच मंजूर करुन घेत असतात. मात्र गरजू तरुणांना आपला रोजगार उभारण्यासाठी कर्ज मिळत नाही. त्यांना बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यामुळे शासनाचा हेतू यातून सफल होत नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात शहरातील काही राष्ट्रीयकृत बँकांकडे माहिती अधिकारांतर्गत मुद्रा योजनेच्या कर्जाची माहिती मागितली असता बँकेने ती माहिती देता येत नसल्याचे सांगितले. असे नरवाडे यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे. मात्र जनहितासाठी मुद्रा कर्ज प्रकरणाची माहिती मागूनही ती मिळत नसेल तर हा माहिती अधिकार कायद्याचा अवमान आहे. हि माहिती देण्यास बँक अधिकारी ज्याअर्थी टाळाटाळ करीत आहे. त्या अर्थी यात काही तरी काळबेर असल्याचे समजते, त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी अनिता खरारे यांच्यासह जनहित याचिका दाखल करुन उपोषण करण्याचा इशारा विवेक नरवाडे यांनी दिला आहे.