बँकांच्या कारवाईने डीएसके गुंतवणूकदार लटकले!

0

पुणे : ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयशी ठरलेल्या डीएसके बिल्डर्स प्रा. लि.चे अध्यक्ष दीपक सखाराम कुलकर्णी व संचालिका त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करणे गुंतवणूकदारांना स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेणे ठरले आहे. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर कुलकर्णी दाम्पत्यांना उच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जापोटी तारण ठेवलेल्या डीएसकेंच्या मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या मालमत्ता विक्रीतून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची सरकारची अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे. बँकांच्या या निर्णयामुळे तपास यंत्रणांनादेखील मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन दिवसांत सेंट्रल बँक ऑफ इंडियाने पुणे, फुरसुंगी, बालेवाडी येथील सुमारे 82 कोटींच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या असून, सिंडिकेट बँकेने सातारा येथील नऊ कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली आहे.

जप्त मालमत्तांचा लिलाव करणार
राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज थकबाकीदार ठरवून डीएसके उद्योग समूहांच्या ताब्यातील मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी ठरावीक वृत्तपत्रात याबाबतची जाहिरात प्रकाशित करून या मालमत्ता ताब्यात घेण्यात येत असल्याचे नोटीसद्वारे जाहीर केले. डीएसके ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च लिमिटेडच्या मालकीचे असलेले फुरसुंगी येथील अनेक भूखंड एसबीआयने ताब्यात घेतले आहेत. तसेच, बालेवाडी येथील डीएस कुलकर्णी डेव्हलपर्स लि.च्या ताब्यातील भूखंडही ताब्यात घेण्यात आलेले आहेत. या सर्व मालमत्तांची एकूण किंमत 82 कोटी 39 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. कंपनी रजिस्टारच्या माहितीनुसार, डीएसके ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च कंपनीवर सुमारे 345 कोटींचे तर डीएसके डेव्हलपर्स लि. कंपनीवर 1400 कोटींचे कर्ज आहे. एसबीआयच्या माहितीनुसार, या संदर्भात डीएसकेंना 6 नोव्हेंबररोजीच नोटीस बजावून मालमत्ता ताब्यात घेण्यात येत असल्याचे कळविले होते. डीएसकेंवरील कर्जवसुलीसाठी बँका त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करतील, असेही बँकांच्यावतीने सांगण्यात आले.

डीएसके संपले तर बिल्डरांना लुटीचे खुले रान!
दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्यामुळे पुण्यातील घरांच्या किमती स्थीर राहात होत्या. आता त्यांना या व्यवसायातून संपविल्यानंतर बांधकाम क्षेत्रातील इतरांना खुले रान मिळणार आहे. महाबीजच्या बियाण्यांच्या ज्या किमती असतात त्यामुळे इतर बियाणे कंपन्या आपल्याही बियाण्यांच्या त्याच्या आसपास किमती ठेवतात. एसटी महामंडळाच्या भाडेदरामुळे खासगी वाहतूकदारांना मनमानी पद्धतीने भाडेवाढ करता येत नाही. त्याचप्रमाणे डीएसके घरांच्या ज्या किमती ठरवित होते, त्याच्याच आसपास इतर बिल्डरांना घराच्या किमती ठरवाव्या लागत होत्या. त्यामुळे आता डीएसके संपले तर इतर बिल्डरांना अक्षरशः लुटीला खुली सूट मिळणार आहे.
– प्रकाश पोहरे, संचालक राज्य पतसंस्था फेडरेशन व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ