धुळे। खरीप हंगामास लवकरच सुरुवात होत आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शेतकर्यांना पतपुरवठा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यांनी दिले. जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी खरीप हंगामाकरीता सुलभ पीक कर्ज योजनेबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अग्रणी बँकेने तयार केलेला वार्षिक पतआराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक विवेक पाटील, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक प्रकाश गिलाणकर , सहाय्यक उपनिबंधक रत्नाळे, सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कार्यकारी अधिकारी , विविध महामंडळांचे अधिकारी उपस्थित होते. डॉ.पांढरपट्टे यावेळी म्हणाले, जिल्ह्याचा एकूण 2300 कोटी रुपयाचा वार्षिक पतआराखडा तयार करतांना कृषी संबधातील खरीप, रब्बी पीक कर्ज आणि त्यासंबधीत योजनांकरिता 1560 कोटी रुपयांची तरतूद या आराखडयात करण्यात आलेली असून लघुउद्योग आणि इतर प्राधान्यक्रम असलेल्या उद्योंगाकरिता 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.