बँकांमध्ये जमा चार लाख कोटी संशयाच्या भोवर्‍यात

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर गेल्या दोन महिन्यांत देशभऱातील बँकांत जमा झालेल्या रकमेपैकी सुमारे 4 लाख कोटींची रक्कम संशयाच्या भोवर्‍यात सापडण्याची चिन्हे आहेत. बँक खात्यांत अघोषित रक्कम जमा करणार्‍यांना नोटीस बजावण्यात येणार असून, जमा रकमेच्या उत्पन्नाचा स्त्रोत जाहीर न करू शकणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर खात्याने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काळात प्राप्तिकर खात्याच्या तपासास वेग येणार आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे भरले जात आहेत. बँकांमध्ये मोठी रक्कम जमा करणार्‍या सुमारे पाच हजार जणांना प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. पुढील काळात हे प्रमाण वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 17 डिसेंबरपर्यंत 1.14 लाख बँक खात्यांत 4 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. या रकमेतील मोठी रक्कम ही काळे पैसे पांढरे करण्याच्या हेतूनचे जमा केली गेली असावी, असा संशय सरकारला वाटतो आहे. त्यामुळेच या सर्व खात्यांची चौकसी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या खातेधारकांचे प्राप्तिकर विवरणपत्र मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
देशभरातील सुमारे 60 लाख व्यक्ती व संस्थांनी गेल्या दोन महिन्यांत देशभऱातील बँकांत सुमारे सात लाख कोटी मूल्याच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत. गेली दोन वर्षे निष्क्रिय असलेल्या देशभरातील सुमारे पन्नास हजार जनधन खात्यांतही मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा करण्यात आली आहे. या खात्यांवरही प्राप्तिकर विभागाते लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चप्तिकर विभागाच्या तपासणीत आणखीही एक विशेष बाब आढळून आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर अवघ्या काही दिवसांतच देशातील सुमारे 1 लाख 80 जणांनी 25 लाखांवरील कर्जाची रक्कम जुन्या नोटांच्या स्वरुपात बँकांमध्ये भरली आहे. या नोटांच्या माध्यमातूनच त्यांनी कर्जाची फेड केल्याचे दिसून आले आहे. काही संस्था व संघटनांनीही कर्जाचे मोठे हप्ते जुन्या नोटांच्या स्वरुपातच भरले आहेत. त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, केवायसी नॉर्म पूर्ण न केलेल्या व ज्या खात्यांत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आलेल्या खात्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.