मुंबई : शेतकर्यांवर कर्ज असते त्यावेळी बँका शेतकर्यांच्या घरावर नोटीस लावतात, तसेच ढोल वाजवून कर्जबाजारी शेतकर्यांच्या नावाची बदनामी करतात. या बदनामीला कंटाळून शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात. आता कर्जमाफीच्या निर्णयाची अमलबजावणी लवकर व्हावी यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाची अमलबजावणी बँकांमध्ये व्यवस्थित होत आहे का नाही, हे पाहण्यासाठी सर्व जिल्हाप्रमुखांना माहिती घेण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सेनाभवनात झालेल्या बैठकीत दिले आहेत. यासाठी बँकांमध्ये जाऊन यासंबंधी नोटीस लावून शिवसेनेचे कार्यकर्ते ढोल वाजविणार असल्याची माहितीदेखील मिळाली आहे. यामुळे पुन्हा शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हाप्रमुखांना दिले आदेश
40 लाख उतारा कोरा होणार आहे का?, वनटाईम सेटलमेंटचा किती शेतकर्यांना फायदा झाला? कर्जफेड झालेल्या शेतकर्यांना 25 हजारची मदत झाली का? यासंबंधी सगळी माहिती शासनाकडून घेतली जाणार आहे. जिल्हास्तरावर ही माहिती घेण्याचे जिल्हाप्रमुखांना आदेश दिले आहेत. कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत शिवसेना सोमवारी राज्यभर आंदोलन करणार असून, राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये सकाळी 11 वाजता ‘ढोलनाद’ करणार आहे. शेतकर्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारने जाहीर केली असली, तरी अद्याप प्रत्यक्षात शेतकर्यांच्या हातात पैसेच आलेले नाहीत. त्यामुळे ज्याप्रकारे कर्जबाजारी शेतकर्यांच्या दारात बँकेचे अधिकारी वसुलीसाठी येतात, तसेच आता शेतकर्यांसाठी शिवसेना त्वरित कर्जमुक्तीसाठी बँकांच्या दारात ढोल वाजवणार आहे.
बँकेत लावणार नोटीस
प्रत्येक जिल्हा बँकेच्या नोटीस बोर्डवर शेतकर्यांची यादी लावून, त्यांना तात्काळ पैसे देऊन कर्जमुक्त करण्यासाठी हे आंदोलन असेल. यासाठी शिवसैनिक बँकेत जाऊन नोटीस लावणार आहेत. सत्तेत सहभागी असणारी शिवेसना पुन्हा एकदा मित्रपक्ष असलेले भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी म्हणून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खान्देशातील शेतकर्यांशी संवाद साधण्यासाठी 13 व 14 जुलैरोजी खानदेश दौरा करणार आहेत. या दौर्यात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकर्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. या दौर्याआधी शेतकरी कर्जमाफीसंबंधी आकडेवारी गोळा करण्याचे निर्देश जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.
नोटिशीच्या भीतीने अनेक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळेच बैठकीत जिल्हा व विभाप्रमुखांना प्रत्येक बँकांकडे जाऊन कर्जमाफीसंबधी नोटीस लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अधिकृत आकडेवारीदेखील घेणार आहोत. हे आकडे पडताळून अधिवेशनात भूमिका घेतली जाणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सेना पुढचेे पाऊल उचलणार आहे.
रामदास कदम, पर्यावरण मंत्री