देशात 2022 पर्यंत 14 लाख लोकांना बँकिंग क्षेत्रात रोजगार मिळू शकणार आहे. बँकिंग क्षेत्रात यंदा नियुक्त्यांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ होईल. विशेष म्हणजे आयबीपीएसने सरकारी बँकांमध्ये चालू आर्थिक वर्षात 16 हजार 344 अधिकारी, 3 हजार 784 विशेष अधिकारी आणि 30 हजार 683 लिपिकांची नियुक्ती केली आहे. एसबीआय शिवाय अन्य बँकापुढील वर्षीपर्यंत 20 हजार अधिकारी आणि 30 हजार लिपिकांची भरती करतील. सरकारी बँकांप्रमाणेच खासगी बँकांतही नेमणुकांची घोषणा होईल. उज्ज्वल भवितव्यासाठी हे आकडे विद्यार्थ्यांचा नक्कीच उत्साह वाढवतील.
बँक क्षेत्रातील विविध पदांसाठी बँकांना सर्व विद्याशाखांतील उमेदवारांची गरज भासणार आहे. गेल्या वर्षी पदवीधारकांबरोबरच अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांचादेखील बँकिंगकडे ओढा वाढल्याचे दिसून आले. बँकिंगकडे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी वळतात. परंतु, वास्तव भिन्न आहे. दरवर्षी प्रशिक्षणासाठी 50 टक्के आयटी, उर्वरित 20 टक्के एमबीए, 10 टक्के विज्ञान, 10 टक्के वाणिज्य आणि 10 टक्के कला शाखेचे पदवीधर आमच्याकडे प्रवेश घेतात, असे बँकिंग प्रशिक्षण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आर. जी. अग्रवाल यांनी सांगितले.