बँकेचा अध्यक्ष कुणी होवो शेतकर्‍यांना एटीएमद्वारे नव्हे थेट कर्ज

नवनिर्वाचित संचालक डॉ. सतीश पाटील यांची राकाँ बैठकीत घोेषणा

जळगाव – जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक संचालक निवडुन आले आहेत. आता अध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू आहे. पण बँकेचा अध्यक्ष कुणीही होऊ द्या आता शेतकर्‍यांना एटीएमद्वारे नव्हे तर थेट कर्ज दिले जाणार असल्याची घोषणा माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक डॉ. सतीश पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचा दि. ५ डिसेंबर रोजी जिल्हा दौरा आणि खा. शरद पवार यांचा दि. १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी होते. बैठकीत राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक डॉ. सतीश पाटील यांनी भाषण करतांना चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले की, जिल्हा बँकेत आम्ही निवडणुकीला उभे राहील्यानंतर कार्यकर्त्यांनी आरोप केले. पण आता लवकरच जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. जिल्हा बँकेची बिनविरोध होणारी निवडणुक मला खुप महागात पडली. आपण ज्यांना मोठे केले तेच आपल्या विरोधात उभे ठाकले. त्यामुळे शेजारी बसणार्‍यांचे चेहरे ओळखता आले पाहीजे. अन्यथा माझ्यासारखा खिसा कापला जाईल. मनिष जैन तुमचे तर अनेकांनी खिसे कापले असे सांगताच बैठकीत हास्याचे फवारे उडाले. नारायण राणे म्हणतात मार्चमध्ये सरकार पडेल. पण कुणाच्याही बापाकडुन ही आघाडी तुटणार नाही असे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील. पण अध्यक्ष कुणीही होवो शेतकर्‍यांना जिल्हा बँकेतुन एटीएमद्वारे नव्हे तर थेट कर्ज आता दिले जाईल अशी घोषणाही डॉ. सतीश पाटील यांनी केली.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, जिल्हा बँकेच्या चेअरमन अ‍ॅड. रोहीणी खडसे, माजी खा. अ‍ॅड. वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, मनीष जैन, युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, तिलोत्तमा पाटील, संजय पवार, घनशाम अग्रवाल, नाना पाटील, वाल्मिक पाटील, रोहन सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.