नवी दिल्ली । बँकेच्या बचत खात्यातून रोख रक्कम काढण्याचे आठवड्याचे निर्बंध भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच उठवणार आहे. अर्थविषयक सचिव शक्तिकांत दास यांनी ही माहिती देताना सांगितले की, रोकड काढण्यासंदर्भातील निर्बंध रिझर्व्ह बँक हटविणार आहे. त्याची अंमलबजावणी होणत्याही क्षणी होऊ शकते.
सध्या 24 हजारांची मर्यादा : सध्याच्या नियमानुसार बचत खात्यातून ग्राहकाला आठवड्यात फक्त 24000 रुपये काढण्याची मुभा आहे. 8 नोव्हेंबरला नोटाबंदी लागू झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रथम 2000 रूपये आणि नंतर 4000 रुपये प्रती दिवस काढण्याची मर्यादा ठेवली होती. तसेच एका आठवठ्यात बँकेतून केवळ 24 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली होती. ही मर्यादा मागील महिन्यात रिझर्व्ह बँकेने वाढवून एका दिवसात 10 हजार रुपये काढण्याची सूट दिली. पण आठवड्यात फक्त 24 हजार रुये काढण्याची मर्यादा कायम ठेवली होती. तसेच मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेने 1 फेब्रुवारीपासून एटीएममधून रोकड काढण्याची मर्यादादेखील उठविली होती. ज्यामुळे बचत खाते असणारे ग्राहक एकावेळी एटीएममधून 24 हजार रुपयांपर्यंत रोकड काढू शकतात. परंतू रिझर्व्ह बँकेने आठवड्यात फक्त 24 हजारांची मर्यादा कायम ठेवली होती.