बँकेत सराफाच्या कारागिराला ठगविले

0

धुळे। येथील सुवर्ण व्यावसायीकाने आपल्या विश्वासू कामगाराला बँकेत पैसे भरण्यासाठी पाठविले असता मालकाचीच ओळख दाखवून आणि त्यांनी सांगितले असे म्हणून या कामगाराकडून लाखो रुपयांची रोकड काढून घेत पोबारा करणार्या भामट्याविरुध्द सुवर्ण व्यावसायीकाने पोलिसात तक्रार केली असून गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, तारगल्लीतील सुवर्ण व्यापारी हितेश सुरेश सोनी यांनी त्यांच्याकडे पोत गाठण्याचे काम करणारा कारागिर साबीर शेख असमद पटवे याला शुक्रवारी 4 लाख 65 हजारांची रोकड देवून ती एचडीएफसी बँकेत भरण्यास सांगितले.

आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सदर कारागिराने ते पैसे एका बॅगेत भरुन ते ग.नं.6 मध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेच्या पहिल्या मजल्यावरील शाखेत भरणा करण्यासाठी नेले. त्याचवेळी तेथे आलेल्या अन्य एकाने साबीर पटवे यास मालकाचे नाव सांगून ते पैसे त्याच्याकडे देण्यास सांगितले असल्याचे भासविल्याने पटवे याने ती रक्कम त्या व्यक्तिच्या हवाली केली.त्यानंतर दुकानावर परत आला असता पटवे याला पैसे भरले का म्हणून सोनी यांनी विचारणा करताच त्याने तुम्ही पाठविलेल्या व्यक्तिकडे ते पैसे जमा केल्याचे सांगितल्याने सोनी यांना धक्काच बसला. आपण असे कुणालाही पैसे घेण्यास सांगितले नव्हते तर मग पटवे याने पैसे दिले कुणाला? हा प्रश्न सोनी यांना छळू लागला. पटवेकडील पैसे लंपास करण्यात आले. हे लक्षात येताच हितेश सोनी यांनी विलंब न लावता तात्काळ आझादनगर पोलीस स्टेशन गाठून स्वतःच तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. तपास सपोनि डी.ए.पाटील यांना सोपविला आहे.