जळगाव । आधारकार्डला ओळखपत्राचे स्वरुप आल्याने आधारकार्ड हा प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील आधार सर्वांना सक्तीचे असल्याचे घोषीत केले आहे. शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, शालेय कामासाठी, आर्थिक व्यवहाराकरीता अशा सर्वच कामासाठी आता आधार सक्तीचे करण्यात आले आहे. शंभर टक्के आधार नोंदणी पुर्ण व्हावी यासाठी शासनातर्फे विविध कॅम्पेन राबविण्यात आले. गावोगावी आधारकार्ड ऑपरेटर नेमणुक करुन आधार नोंदणी करण्यात आली. मात्र अद्यापही शंभर टक्के आधार नोंदणी झालेली नसल्याने 15 मार्च पर्यत आधार नोंदणी न केल्यास सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी लाभापासून मुकणार आहे.
बोगस लाभार्थी वगळले जाणार
वृध्दापकाळ, विधवा, अपंग आदी पेन्शन मिळविणार्यांनी आधारकार्ड नोंदणी केली नसल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहिर केले आहे. प्रशासनातर्फे आधार लिंक न झालेल्या खात्यांची तपासणी केली जाणार आहे. बँकेशी आधार लिंक नसलेल्या खात्याची चौकशी करण्याचे आदेश तालुकास्तरावर देण्यात आले आहे. शासकीय योजनेचे लाभ घेणारे अनेक बोगस लाभार्थी असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे. योनजेसाठी पात्रता नसतांनाही अनेक शासकीय योजनेचे लाभ घेतात. बँकेशी आधार लिंक केल्यास बोगस लाभार्थी आपोआपच वगळले जाणार आहे. तसेच जी व्यक्ती पेन्शनची गरज नसतांनाही पेन्शन घेत असेल, मयत खातेदार आदींचे खाते चौकशीनंतर बंद करण्यात येणार आहे.
आधार नोंदणी (कंसात आधार लिंक)
जळगाव शहर (1185), जळगाव ग्रामीण (4752), जामनेर (5101), एरंडोल (2061),, धरणगांव (5598), भुसावळ शहर (536), भुसावळ ग्रामीण (1353), यावल (3391), रावेर (4815), मुक्ताईनगर (2092), बोदवड (1891), पाचोरा (2584), चाळीसगाव (6711), भडगाव (1636), अमळनेर (2501), पारोळा (1430), चोपडा (5007) संपुर्ण जिल्ह्यातील 52 हजार 634 लाभार्थ्यांनी बँक खात्यांशी आधार लिंक केले आहे.
37 हजार आधार बँकेशी लिंक नाही
शासकीय योजनेचे लाभ घेणार्या लाभार्थ्यांना आधार सक्तीचे करण्यात आले आहे. मुदतीत आधार लिंक न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे जाहिर करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकुण 90 हजार 139 लाभार्थी शासकीय योजनेचे लाभ घेत आहे. योजनेचे लाभ घेणार्या 81 हजार 591 लाभार्थ्यांनी आधार लिंक केले आहे. अद्यापही जिल्ह्यातील 37 हजार 507 लाभार्थ्यांनी बँकेशी आधार लिंक केले नसल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे.