बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांसह 6 अटकेत

0

पुणे । गुंतवणूकदारांची फसवणूक व बँकांचे कर्ज थकवल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना अधिकारांचा गैरवापर करून नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता यांच्यासह अन्य चार जणांना बुधवारी अटक केली. रवींद्र मराठे, गुप्ता यांच्यासह डीएसकेंचे सीए सुनील घाटपांडे, अभियंता विभागातील अधिकारी राजीव नेवासेकर यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातून, बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांना जयपूरमधून आणि बँकेचे अधिकारी नित्यानंद देशपांडे यांना अहमदाबादमधून अटक केली आहे. त्यांच्यावर अधिकारांचा गैरवापर करून डीएसकेंना बेकायदेशीररित्या कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे. या सहा जणांच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रविंद्र मराठे आणि इतरांवर डीएसके घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. बिल्डर डीएसके यांच्या अनेक कंपन्या होत्या. त्यापैकी काही कंपन्या केवळ कागदावर असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, माजी व्यवस्थापकीय संचालक आणि अधिकार्‍यांनी डीएसकेंच्या बोगस कंपन्यांना कर्ज दिल्याचे तसेच आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून डीएसके यांना मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गुंतवणुकदारांचे पैसे बुडविल्याप्रकरणी सर्वप्रथम डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्ली येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत असतानाच डीएसके प्रकृती खालावल्याने खाली पडले होते. त्यामुळे त्यांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढली
डीएसके घोटाळ्याची व्याप्ती वाढत असतानाच डीएसकेंच्या जवळच्या नातेवाईकांनादेखील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. घोटाळ्याचे चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास चालू असतानाच आता महाराष्ट्र बँकेच्या अधिकार्‍यांची चौकशी सुरू झाली आहे. बँकांच्या या अधिकार्‍यांवर अधिकाराचा दुरूपयोग करून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना त्यांच्या बोगस कंपन्यांवर कर्ज दिल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या तापासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रदीप देशपांडे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलसांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालकांसह इतरांनी बुधवारी दुपारी अटक केली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकीय संचालकांसह इतरांना अटक झाल्याने बँकिंग क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.