पुणे : ‘चालक ते मालक‘ या बहुचर्चित योजनेत तब्बल 836 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे पुणे विभागीय माजी व्यवस्थापक पद्माकर देशपांडे व सुरतस्थित एका लॉजिस्टीक कंपन्याच्या संचालकाला काल सीबीआयने अटक केली. या अटकेने महाबँकेतील आणखी एक घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. 2012-14 मध्ये संबंधितांनी चालकांच्या कागदपत्रांची खातरजमा न करताच तब्बल 2802 चालकांना ट्रक खरेदी करण्यासाठी कर्ज दिले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे कर्ज देण्यात आल्याचे उघडकीस आले होते. तसेच, काही चालकांना तर आपल्या नावावर कर्ज उचलले गेले हेदेखील माहित नव्हते.
बनावट कागदपत्रे अन् बोगस कर्जप्रकरणे
या घोटाळ्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्याच काही अधिकार्यांनी सीबीआयकडे तक्रार केली होती. 2012-2014 मध्ये बँकेने चालक ते मालक अशी योजना राबविली होती. या योजनेंतर्गत ट्रक चालकांना ट्रक खरेदीसाठी बँकेने कर्ज दिले होते. 2802 चालकांना हे कर्ज देण्यात आले होते. पैकी अनेकांची बनावट कागदपत्रे असल्याची बाब निदर्शनास आली होती. तसेच, अनेक चालकांना तर आपल्या नावावर कर्ज उचलले गेले हेदेखील माहित नव्हते. या कर्जप्रकरणात एकूण 836 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. सुरत येथील एका लॉजिस्टीक कंपनीच्या साहाय्याने हा घोटाळा करण्यात आला होता. ही बाब काही अधिकार्यांच्या लक्षात येताच त्यांनी सीबीआयकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून तपास झाल्यानंतर शनिवारी अखेर महाबँकेच्या माजी सरव्यवस्थापकासह लॉजिस्टीक कंपनीच्या 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली.
घरावर छापा, दस्तावेज जप्त
बनावट कागदपत्रे सादर करून हे कर्ज मंजूर करण्यात आले होते. हे कर्जप्रकरणे मंजूर करताना पुणे विभागीय व्यवस्थापक पद्माकर देशपांडे यांनी बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचेही उल्लंघन केले होते. सीबीआयने बँक अधिकार्यासह ज्या कंपनीच्या संचालकांना अटक केली तो कंपनीचे खाते ऑपरेट करत होता. सीबीआयने संबंधितांना अटक करण्यापूर्वी देशपांडेंच्या घरी छापाही टाकला होता. त्यात इलेक्ट्रॉनिक गॅझेट, एलआयसी पॉलिसीचे पेपर, बँक लॉकरच्या चाव्या व अन्य दस्तावेज जप्त करण्यात आला आहे.