बँक खाते-आधार लिकिंगला मुदतवाढ!

0

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्रालयाने बँक खात्याला आधार क्रमांकाशी लिंक करण्याच्या आपल्या आदेशाला मुदतवाढ दिली आहे. यापूर्वीच्या आदेशानुसार 31 डिसेंबरपर्यंत बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करणे अनिवार्य होते. परंतु, आता ही मुदत वाढवून 31 मार्च 2018 करण्यात आलेली आहे. लिकिंगच्या आदेशाबाबत अर्थमंत्रालयाचा गोंधळही चव्हाट्यावर आला. मंत्रालयाने परिपत्रक काढून लिकिंगची ही मुदत अनिश्चित काळासाठी वाढविण्यात आल्याचे सांगितले होते. परंतु, पुन्हा 31 मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आधारसक्तीबाबत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार असून, मागील सुनावणीत केंद्राचे महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी ज्या लोकांकडे आधारकार्ड नाही, त्यांच्यासाठी बँक खात्याला आधारक्रमांक लिंकिंग करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली असल्याचे सांगितले होते. त्यासाठी शुक्रवारी परिपत्रक जारी केले जाईल, असेही सांगितले होते. त्यानुसार परिपत्रकही जारी झाले होते. परंतु, उद्याच्या सुनावणीपूर्वीच सरकारने मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला. दुसरीकडे, मोबाईल क्रमांकालाही आधारक्रमांक लिंक करण्यासाठीची अंतिम मुदत ही 6 फेब्रुवारी 2018 असल्याची माहितीही अर्थमंत्रालयाने दिली आहे. ही मुदत वाढविली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

मार्चपर्यंत सवलत मिळाल्याने दिलासा
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, देशात तब्बल 115 कोटी लोकांकडे आधारकार्ड आहे, तर 33 कोटी लोकांकडे पॅनकार्ड आहे. यापैकी अनेकांनी अद्यापही आधार आणि पॅनकार्ड बँक खात्याला लिंक केलेले नाही. त्यामुळे सरकारने हे निर्णय घेतला असावा असे बोलले जात आहे. मात्र मोबाईल क्रमांकाला आधार क्रमांक जोडण्याची 6 फेब्रुवारी 2018 ही मुदत वाढवली जाणार नाही. केंद्र सरकारने सर्व कामांसाठी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. आता बँक खात्याशी आधार लिंक करण्यासाठी नागरिकांना मार्चपर्यंत सवलत मिळाली आहे.

या सेवांसाठी आधार-पॅन लिंकिंग गरजेचे!
केंद्र सरकारने मंगळवारी काळापैसा प्रतिबंधक कायद्यात बदल केल्याने आधार किंवा पॅन क्रमांक सरकारने दिलेल्या तारखेत बँक खात्याशी जोडण्यात यावे, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. याबाबत गुरुवारपासून सुनावणी होणार आहे. आधार क्रमांक बँक खात्यांशी जोडणे बंधनकारक करण्यात येऊ नये, यासाठी न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु होणार आहे. सद्या बँक अकाउंट, पोस्ट ऑफिस अकाउंट, म्युच्युअल फंड अकाउंट, डिमॅट अकाउंट, विमा पॉलिसीला आधार आणि पॅन लिंक करणे आवश्यक आहे. आता या सेवांसाठी आधार आणि पॅन लिंक करण्याची नवी तारीख अर्थमंत्रालयाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.