बँक खाते जोडणीची मुदत 31 डिसेंबरच

0

मुंबई : आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्यासाठी केंद्र सरकार एकीकडे मुदतवाढीचा विचार करत असताना युआयडीने मात्र 31 डिसेंबरपर्यंत बँक खात्याशी आधार कार्ड जोडणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. 31 डिसेंबरपर्यंत आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी जोडला नाही तर ती बँक खाती बंद होतील. आधार कार्ड नसणारे आधारचा एनरोलमेंट आयडी देऊन अकाउंट पुन्हा सुरू करू शकतात, अशी माहिती युआयडीच्या एका अधिकार्‍याने दिली आहे.

केंद्राकडून मुदतवाढीचे निर्देश नाहीत
बँक खाते, म्युच्युअल फंड, विमा आणि मोबाइलशी आधार क्रमांक जोडण्याला नव्याने मुदतवाढ दिल्याचे कुठलेही निर्देश केंद्र सरकारने दिलेले नाहीत, असे युआयडीच्या अधिकार्‍याने म्हटले आहे. केंद्र सरकराने 8 डिसेंबरला पॅनकार्ड आधारशी जोडण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढवली आहे. यासोबतच बँक खाते, म्युच्युअल फंड, विमा आणि मोबाइल क्रमांकाशी आधार क्रमांक 31 मार्चपर्यंत जोडण्याच्या मुदतवाढीवरही सकारात्मक असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मागील आठवड्यात सांगितले होते. पण यावर सरकारने अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यामुळे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची मुदत ही अजूनही 31 डिसेंबरपर्यंतच आहे. मोबाइल क्रमांकाशी आधार जोडण्याची मुदत 6 फेब्रुवारीपर्यंत आहे.