बँक खात्याची माहिती काढून पैशांचा अपहार

0

मुंबई – बँक खात्याची माहिती घेऊन एका अज्ञात भामट्याने महिलेच्या खात्यातून सुमारे 26 हजार रुपयांचा अपहार केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन डी. एन. नगर पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

पळून गेलेल्या भामट्याचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी शोध घेत आहेत. मंजू चंद्रमोहन चोप्रा ही महिला अंधेरीतील जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील जुहू समीप अपार्टमेंटमध्ये राहते. तिचे आयसीआयसीआय बँकेत एक खाते आहे. काल सकाळी सव्वाअकरा वाजता एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून तिच्या बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या कार्डचा ओटीपी क्रमांक मिळवून बोगस कार्डद्वारे तिच्या बँक खात्यातून सुमारे 26 हजार रुपयांचा अपहार केला होता. हा प्रकार नंतर मंजू चोप्रा यांच्या लक्षात येताच तिने डी. एन. नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.