नवी दिल्ली । केंद्र सरकार सरकारी कामकाजामध्ये आधारकार्डच्या वापराबाबत सुरुवातीपासूनच आग्रही असल्यामुळे आता केंद्राने बँक खाते उघडण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक असल्याचे सांगत तसा निर्णय घेतला आहे. केंद्राने आधार कार्डबाबत घेतलेला हा मोठा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे.
मोठ्या व्यवहारांसाठी आधार लागणार
खाते उघडण्यापासून मोठ्या व्यवहारांपर्यंतही आधार कार्ड बंधनकार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांमधील व्यवहारासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. या बंधनामुळे काळ्या पैशांवर आळा बसेल असे सरकारकडून सांगितले जात आहे. तसेच सर्व बँक खातेधारकांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत आधार क्रमांक बँकेत जोडण्यास सांगण्यात आले आहे आणि असे न केल्यास त्यांची बँक खाती अवैध ठरवली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नव्या खात्यासाठीचे नवे नियम
जर एखाद्याला कोणत्याही बँकेत नवीन खाते उघडायचे असेल आणि त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल, तर त्यांना आधार एनरोलमेंट प्रूफ द्यावा लागेल. खाते उघडल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना आधार क्रमांक द्यावा लागेल.
मोठ्या उलाढालीवर करडी नजर
बँक खाते उघड करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आल्यामुळे आता सरकाराला लोकांच्या खात्यात जमा होणारे पैसे आणि त्यांच्या खरेदीवर बारीक लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे. कारण आता घर खरेदीसाठीही आधार कार्ड बंधनकारक असल्यामुळे एखाद्या व्यक्तीने घर खरेदी केल्यास त्यावर सरकारची नजर राहिल. अशाच पध्दतीने सरकार लोकांच्या खात्यांमधील उलाढालीवरही नजर ठेवता येणार आहे.